नवी दिल्ली Kavita Petition in Supreme Court : दिल्ली मद्यधोरण प्रकरणात बीआरएसच्या नेत्या कविता यांना ईडीनं अटक केलीय. यानंतर त्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलीय. अटक हे केवळ नियम आणि कायद्यांचं उल्लंघन नाही तर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं त्यांनी याचिकेत नमूद केलं. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) याबाबत एकतर्फी आणि हुकूमशाही पद्धतीनं कारवाई केल्याचं याचिकेत म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी प्रलंबित असतानाही ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकतर्फी कारवाई केल्याचा दावा त्यांनी याचिकेत केलाय.
आरोपपत्रांमध्ये नाव नसताना अटक : कविता यांनी याचिकेत म्हटले, "दिल्लीच्या मद्यधोरण प्रकरणात माझा काहीही संबंध नसतानाही ईडी माझी चौकशी करत आहे. या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये किंवा आतापर्यंत दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्येही माझं कुठंही आरोपी म्हणून नाव दिलेलं नाही. 2022 मध्ये सीबीआयनं माझी सात तास चौकशी केली. कोणत्याही पुराव्याअभावी माझा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, या प्रकरणात सहभागी असलेल्या काही लोकांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे ते मला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मला अटक करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळं नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचं दिसून येत आहे. काही लोकांना वेठीस धरण्यासाठी केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून राजकीय हिंसाचार सुरुच ठेवत आहे. दिल्लीतील मद्यधोरण प्रकरणाचा आधार घेत केंद्रातील सत्ताधारी पक्ष काही लोकांना टार्गेट करुन त्रास देत असल्याचं कविता यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलंय.