अमरावती Tirupati Laddu Controversy : तिरुपती लाडू वादावरून देशात खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लाडू प्रसादात चरबी मिसळल्याचा दावा केलाय. या मुद्द्यावरून आता चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या प्रकरणावर आमने-सामने आलेत. दरम्यान, जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर तिरुपती देवस्थानाच्या पावित्र्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.
चंद्राबाबू नायडू खोटं बोलणारे :जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, "आंध्रप्रदेश राज्यात घडत असलेल्या निंदनीय घटनांकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या पावित्र्याचं, अखंडतेचं आणि प्रतिष्ठेचं कधीही भरून न येणारे नुकसान झालंय. भगवान वेंकटेश्वरांचे भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी भक्त आहेत. चंद्राबाबू नायडू हे खोटं बोलणारे आहेत. ते राजकीय हेतूसाठी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी खेळत आहेत. त्यांच्या विधानामुळं भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही, तर याचे वाईट परिणाम होऊ शकतात."