नवी दिल्ली INDIA alliance rally in Ramlila Maidan : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात 'इंडिया' आघाडीकडून आज रामलीला मैदानावर महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बोलताना राहुल गांधींनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले, "सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. जेव्हा बेईमानीने अंपायर वर दबाव टाकून, खेळाडूंना विकत घेऊन किंवा कर्णधाराला घाबरवून मॅच जिंकल्या जातात, तेव्हा क्रिकेटमध्ये याला मॅच फिक्सिंग म्हटलं जातं. आपल्या समोर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये अशाच पद्धतीने "मॅच फिक्सिंग" सुरू आहे, असं म्हणत अंपायर कोणी निवडले तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यांनी मॅच सुरू होण्यापूर्वीच आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक केली. त्यामुळे या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी "मॅच फिक्सिंग" करण्याचा प्रयत्न करत आहेत," असा थेट आरोप राहुल गांधींनी केला आहे. तसंच, "'400 पार' जागा जिंकण्याची भाजपाकडून घोषणा केली. मात्र, ईव्हीएम, मॅच फिक्सिंग, प्रेसवर दबाव न टाकता हे 180 सुद्धा जागा जिंकणार नाहीत," असा हल्लाबोलही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.
सोरेन आणि केजरीवाल आमच्या बहिणी : "देशात काँग्रेस सर्वात मोठा विरोधीपक्ष आहे. आमचे सर्व बँक खाते बंद करण्यात आले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सर्वात मोठ्या विरोधीपक्षाचे सर्वच बँक अकाउंट बंद करण्यात आले आहेत. आम्हाला प्रचार मोहीम सुरू करायाची आहे. पोस्टर लावायचे आहेत. आमचे सर्व स्त्रोत बंद करण्यात आलेत. मग ही कशी निवडणूक होत आहे?," असा प्रश्न राहुल यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान, या सभेला उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम संबोधित केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, "कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल आमच्या बहिणी आहेत. आमच्या बहिणी या हुकूमशाही सरकारच्या विरोधात लढत असताना आमच्यासारखे भाऊ कसे मागे राहतील," असा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच, "मी भाजपाला आव्हान देतो की, जो पक्ष भाजपासोबत आहे तो ईडी, सीबीआय आणि आयटी आहे, असे बॅनर लावावे," असंही ते म्हणाले आहेत.