महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

"मला त्यांच्या तत्त्वांची माहिती नाही", आदित्य ठाकरेंची शरद पवारांवर टीका, गांधींच्या भेटीनंतर आदित्यनं घेतली केजरीवालांची भेट - ADITYA THACKERAY MEET KEJRIWAL

पवारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण झालाय. याच गोंधळादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतलीय.

Aditya Thackeray press conference
आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद (Source- ETV Bharat)

By PTI

Published : Feb 13, 2025, 1:51 PM IST

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्ली निवडणुकीत आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढल्यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचंही चित्र निर्माण झालंय. परंतु आता पुन्हा एकदा इंडिया आघाडीतील पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आहेत. त्याच कारणास्तव आज शिवसेनेचे (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण झालाय. परंतु याच गोंधळादरम्यान शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतलीय.

आदित्य अरविंद केजरीवालांच्या भेटीला : बुधवारी रात्री उशिरा त्यांनी राष्ट्रीय राजधानीत राहुल गांधी यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाविरुद्धच्या आरोपांवरही या दोघांनी चर्चा केल्याचे समजते. आदित्य ठाकरे हे गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव झाल्यानंतर आता अरविंद केजरीवालांच्या भेटीला गेले आहेत. 2022 मध्ये तत्कालीन अविभाजित शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह निघून गेलेल्या शिंदे यांना पवारांनी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान केल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महाविकास आघाडीत वाद उफाळून आलाय. भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर नियंत्रण मिळवले. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) महायुतीने विजय मिळवला, ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात अक्षरशः विजय मिळवल्यानंतर पुन्हा एकदा विजयाची आशा असलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने शिंदे यांना "गद्दार" म्हटले आणि पुण्यातील स्वयंसेवी संस्था सरहदने स्थापित केलेल्या पुरस्काराने शरद पवारांनी त्यांचा सत्कार केल्याचे पाहून त्यांना धक्का बसलाय.

मला त्यांच्या (पवारांच्या) तत्त्वांची माहिती नाही - आदित्य ठाकरे : "महाराष्ट्रविरोधी असलेले लोक राष्ट्रविरोधी आहेत. अशा घाणेरड्या कामात सहभागी असलेल्या व्यक्तींचा आपण सन्मान करू शकत नाही. हे आमच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. मला त्यांच्या (पवारांच्या) तत्त्वांची माहिती नाही," असंही आदित्य ठाकरे म्हणालेत. दिल्लीतील 70 पैकी 48 विधानसभा जागा जिंकून भाजपाने एकहाती सत्ता मिळवली, तर 5 फेब्रुवारीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ने 22 जागा जिंकल्यात. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आप'चा आरोप आहे की, सलग तिसऱ्यांदा एकही जागा न जिंकणाऱ्या काँग्रेसने किमान 13 जागांवर आपली संधी गमावली. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 सदस्यांच्या सभागृहात 235 जागा जिंकल्या होत्या, तर विरोधी महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागा जिंकता आल्या होत्या.

हेही वाचा -

  1. शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "मी काँग्रेसमध्येच..."
  2. Rajan Salvi : "माझ्या कुटुंबियांना...", एसीबीच्या चौकशीनंतर आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details