पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या आपचे खासदार संजय सिंह यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी खासदार संजय सिंह यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. संजय सिंह यांनी सुलक्षणा सावंत यांच्यावर नुकतेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
नोकरीसाठी प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी पैसे घेतल्याचे आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला होता. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी संजय सिंह यांच्या विरोधात गोव्यातील बिचोलिम येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागीय न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला.
सुलक्षणा सावंत यांनी याचिकेत काय म्हटले?
- कोणतेही विश्वसनीय पुरावे नसताना आप खासदार संजय सिंह यांनी बदनामीकारक आरोप केल्याचा दावा सुलक्षणा सावंत यांनी न्यायालयातील याचिकेत केला.
- आपचे खासदार यांनी पत्रकार परिषदेत केलेली विधाने सार्वजनिक जीवनातील प्रतिमा मलिन करणारे आणि बदनामीकारक आहेत, असे सुलक्षणा सावंत यांनी म्हटलं आहे.
- संजय सिंह यांनी केलेली विधाने अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक न्यूज चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले. यूटूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आली आहेत. ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी पाहिली आहेत, असे प्रमोद सावंत यांच्या पत्नीनं याचिकेत नमूद केलं आहे.
- सुलक्षणा सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी कायदेशीर कारवाईमध्ये मानहानीसाठी 100 कोटी रुपयांची नुकसानभरपाई संजय सिंग यांच्याकडून मागितली आहे. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना सुलक्षणा सावंत यांच्याविरोधात बदनामीकारक विधाने, व्हिडिओ किंवा लेख प्रकाशित करण्यापासून रोखावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
- सावंत यांनी सिंग यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
- खटल्यादरम्यान सिंह किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आणखी बदनामीकारक विधाने टाळण्यासाठी मनाई करण्यासाठी आदेश काढावेत, असे याचिकेत म्हटलं आहे.
आपचे खासदार संजय सिंह यांनी काय केले होते आरोप?आपचे खासदार संजय सिंह यांनी नुकतेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी म्हटले, "गेल्या 10 वर्षात भाजपा सरकार रोजगार निर्मितीच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि लाचखोरीत गुंतलं आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीसह त्यांच्या अनेक मंत्र्यांचं नाव आहे. हा काही लहानसा मुद्दा नाही. गोव्यात भ्रष्टाचार आणि लाचखोरीचा मोठा घोटाळा आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांचा थेट सहभाग आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि विविध दलालांची नावे उजेडात आली आहेत." संजय सिंह यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी तत्कालीन राज्यपालांचे संदर्भदेखील दिले. त्यांनी म्हटलं, " "मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी नोकरी घोटाळ्यात सामील असल्याचं तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जाहीरपणे म्हटलं होते. यावरून गोव्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने लाच घेण्यात गुंतल्याचे स्पष्ट होते."
- गोवा सरकारकडून कथित घोटाळ्याबाबत तपास सुरू-दरम्यान, गोवा सरकारमध्ये नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत काही लोकांना लाखो रुपये देण्यास भाग पाडण्यात आल्याच्या काही जणांनी तक्रारी केल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोटाळ्याचा पारदर्शकपणे तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा-