गांधीनगर Foreign Students Attacked Gujarat University : गुजरात विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. वसतिगृह परिसरात रमजान दरम्यान नमाज पठणावरुन वाद झाला. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसंच वसतिगृहाच्या खोल्यांमध्येही घुसून तोडफोड करण्यात आलीय. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणावाचं वातावरण आहे.
नमाज पठणावरुन वाद : अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, सीरिया, आफ्रिक आदी देशांतील विद्यार्थी गुजरात विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उझबेकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका येथील चार विद्यार्थी त्यांच्या खोलीत नमाज पठण करत होते. त्याचवेळी एका गटानं निषेध करत धार्मिक घोषणा दिल्या. यावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली.
परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला : गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या ए ब्लॉकमध्ये एका गटानं परदेशी विद्यार्थ्यांवर दगडफेक केली. तसंच जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी वाहनाचंही नुकसान करण्यात आलं. यात चार जण जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. रात्री उशीरा ही घटना घडल्याचं पीआय एसआर बावा यांनी सांगितलं. या घटनेचा तपास चालू असल्याचं देखील ते म्हणाले.