नवी दिल्ली Karpoori Thakur Bharat Ratna : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी ओळखले जातात. बुधवारी, 24 जानेवारीला कर्पूरी ठाकूर यांची 100 वी जयंती आहे.
जदयूनं मागणी केली होती : जनता दल युनायटेड (JDU) नं कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. या घोषणेनंतर जेडीयूनं मोदी सरकारचं आभार मानलं आहे. कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी सांगितलं की, "आम्हाला 36 वर्षांच्या तपश्चर्येचं फळ मिळालं. माझं कुटुंब आणि बिहारच्या 15 कोटी जनतेच्या वतीनं मी सरकारचं आभार मानतो".
बिहारचे दोनदा मुख्यमंत्री :24 जानेवारी 1924 ला बिहारच्या समस्तीपूर येथे जन्मलेले कर्पुरी ठाकूर हे दोनदा बिहारचे उपमुख्यमंत्री, दोनदा मुख्यमंत्री, तसेच आमदार आणि अनेक दशकं विरोधी पक्षाचे नेते होते. 1952 मध्ये पहिल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर ते बिहार विधानसभा निवडणुकीत कधीही पराभूत झाले नाहीत. ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. मात्र ते एकदाही त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. शिक्षण मंत्री या नात्यानं ठाकूर यांनी मॅट्रिक स्तरावर इंग्रजी हा अनिवार्य विषय म्हणून रद्द केला. त्यांनी मागासलेल्या भागात अनेक शाळा आणि महाविद्यालयं स्थापन केली आणि 8 वी पर्यंतचं शिक्षण मोफत केलं होतं.
मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केलं : कर्पुरी ठाकूर यांनी आरक्षणासाठी 'कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला' सादर केला होता. याचा उद्देश सरकारी सेवांमध्ये मागासवर्गीयांना समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करणं हा होता. नोव्हेंबर 1978 मध्ये त्यांनी बिहारमध्ये मागासवर्गीयांसाठी 26 टक्के आरक्षण लागू केलं. यानंतर 1990 च्या दशकात मंडल आयोगाच्या शिफारशींचा टप्पा निश्चित केला गेला. या धोरणानं केवळ मागासवर्गीयांनाच सशक्त केलं नाही, तर प्रादेशिक पक्षांच्या उदयासही सुरुवात झाली. यामुळे हिंदी भाषिक पट्यातील राजकारणाचा चेहरामोहरा बदलून गेला.
हे वाचलंत का :
- कोण होते जिल्हाधिकारी के के नायर, ज्यांनी राम मंदिरासाठी चक्क पंतप्रधान नेहरूंचा आदेश धूडकावून लावला!