चंदीगड Fire Caught In Moving Bus In Nuh :चालत्या प्रवाशी बस पेटल्यानं आगीत 8 भाविकांचा बळी गेल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेत तब्बल 24 प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही घटना पलवल एक्सप्रेस वेवर शुक्रवारी रात्री नूह इथं घडली. कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवरुन हे भाविक रात्री उशिरा जात होते. मात्र याचवेळी बसनं पेट घेतला. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेतील गंभीर जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वृंदावनला निघाले होते पंजाब, चंदीगडचे भाविक :पंजाब आणि चंदीगडचे भाविक मथुरा आणि वंदावनला दर्शनासाठी गेले होते. मात्र मथुरा आणि वृंदावन दर्शन करुन परत येताना ही भीषण घटना घडली. या बसमध्ये तब्बल 60 भाविक होते. यात महिला आणि चिमुकल्या मुलांचाही समावेश होता. ही बस कुंडली मानेसर एक्सप्रेसवर नूह जिल्ह्यातील तवाडू शहराजवळ पोहोचल्यानंतर तिला अचानक आग लागली. या आगीत 8 भाविकांचा जळून कोळसा झाला. तर 24 भाविक होरपळून गंभीर जखमी झाले.
बस पेटल्याचं चालकाच्या लक्षात न आल्यानं गेले बळी :वृंदावनवरुन परत येताना तवाडूच्या जवळ आल्यानंतर या बसनं मागच्या बाजून पेट घेतला. त्यावेळी बस पेटल्याचं चालकाच्या लक्षात आलं नाही. याबाबत माहिती देताना बसमधील सरोज म्हणाला की, "आम्ही मथुरा आणि वृंदावनला जाण्यासाठी प्रवाशी बस भाड्यानं घेतली होती. त्यानंतर आम्ही बनारस, मथुरा आणि वृंदावन दर्शन केलं. या बसमध्ये 60 भाविकांचा समावेश होता. यात महिला आणि मुलंही आमच्या सोबत होती. आम्ही सगळे पंजाब, लुधियाणा, होशियारपूर आणि चंदीगडचे राहणारे आहोत. आम्ही सगळे नात्यातीलचं आहोत. दर्शन करुन जेव्हा आम्ही परतलो, तेव्हा रात्री उशीरा सगळे जण झोपत असताना बसच्या मागच्या बाजुला ही आग लागली. बसच्या मागं आगीचे लोळ उठले असताना चालकाला या आगीची माहिती मिळाली नाही."