हैदराबाद : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकाराचे काँग्रेसचे सर्व आरोप भारतीय निवडणूक आयोगानं (ECI) फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगानं पक्षाचे प्रत्येक आरोप निराधार, चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलंय. निवडणूक आयोगानं काँग्रेसला पत्र लिहून बिनबुडाचे आरोप टाळण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेस पक्षानं 'ईव्हीएम'वर प्रश्न उपस्थित केले होते. 'ईव्हीएम'बाबत अनेक तक्रारी माझ्याकडं आल्या असल्याचा दावाही काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला होता.
बिनबुडाचे आरोप करणं टाळावं :हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपानं 48 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला, तर काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला होता. या निकालानंतर काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगानं मंगळवारी (29 ऑक्टोबर) उत्तर दिलंय. बेजबाबदार आरोपांमुळं जनतेमध्ये अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असं आयोगानं म्हटलंय. काँग्रेसनं बिनबुडाचे आरोप करणं टाळावं, असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय. पुराव्याशिवाय निवडणूक प्रक्रियेवर आरोप करणं टाळावं, असंही निवडणूक आयोगानं काँग्रेसला सांगितलं.