नवी दिल्ली PM Narendra Modi on ED : मोदी सरकार हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षांचं सरकार पाडत असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत आहेत. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून केंद्र सरकारनं विविध राज्यातील सरकार पाडले असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलंय. ईडीनं नोंदवलेले सर्वाधिक (९७ टक्के) गुन्हे अशा व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आहेत, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळं विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय.
पंतप्रधानांनी केलं ईडीचं कौतुक : विरोधी पक्षांचा आरोप फेटाळून लावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "ईडीनं नोंदवलेले सर्वाधिक (९७ टक्के) गुन्हे अशा व्यक्ती आणि संस्थांवर आहेत, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळं प्रामाणिक लोकांना घाबरण्याची गरज नाही. पण भ्रष्टाचारात गुंतलेल्या लोकांना पापाची भीती वाटते." पंतप्रधानांनी ईडीचंही कौतुक केलं आणि सांगितलं की, "2014 मध्ये केंद्रात पदभार स्वीकारल्यापासून या केंद्रीय एजन्सीनं भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2014 साली ईडीनं फक्त 5 हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. ईडीला कारवाई करण्यापासून कोणी रोखले नाही."
भ्रष्ट लोकांना पापाची भीती : "किती विरोधी नेते तुरुंगात आहेत? मला कोणी सांगत नाही. भ्रष्ट लोकांना पापाची भीती असते. प्रामाणिक माणसाला कशाचीही भीती नसते. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा ईडीनं माझ्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकलं. देशानं हे समजून घेतलं पाहिजे की ईडीच्या केवळ 3 टक्के प्रकरणांमध्ये राजकारण्यांचा समावेश आहे आणि 97 टक्के प्रकरणे राजकारणाशी संबंधित नसलेल्या लोकांवर दाखल आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.