नवी दिल्ली Swati Maliwal Assault Case :आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना 13 मे रोजी झालेल्या कथित मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी रात्री उशिरा एफआयआर नोंदवला. यामध्ये केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला. स्वाती मालीवाल यांनी बिभवनं त्यांना चापट, लाथा मारुन अंगावर वार केल्याची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणी बिभव कुमार यांना महिला आयोगानं नोटीस जारी करत शुक्रवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे.
स्वाती मालीवाल यांच्या घरी जाऊन नोंदवला जबाब :गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद सिंह कुशवाह आणि उत्तर जिल्ह्याच्या महिला अतिरिक्त पोलीस उपायुक्त या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाती मालीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. या दोन अधिकाऱ्यांनी तब्बल 4 तास चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची या प्रकरणी बैठक घेतल्यानंतर रात्री उशिरा एफआयआर नोंदवण्यात आला.
स्वाती मालीवाल यांनी केला होता 112 क्रमांकाला फोन :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी स्वाती मालीवाल यांना कथित मारहाण झाल्यानंतर त्यांनी 112 क्रमांकावर कॉल केला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाल्या. मात्र त्यांनी तक्रार दाखल न करताच पोलीस ठाण्यातून परत जाणं पसंद केलं. आपण दोन ते तीन दिवसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती स्वाती मालीवाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. स्वाती मालीवाल यांनी पीसीआर कॉल करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांनी मुख्यमंत्री निवासस्थानात कथित मारहाण केल्याचा आरोप केला. या हायप्रोफाईल प्रकरणामुळे दिल्ली पोलिसांचे उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घातलं. उत्तर जिल्हा पोलीस उपायुक्त एम के मीना यांनी स्वाती मालीवाल या पोलीस ठाण्यात आल्या, मात्र त्यांनी तक्रार न करता परत गेल्या, अशी माहिती दिली.