नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना 'आप'चे संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी ( Delhi liquor policy case ) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयानं ईडीला दिली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयानं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मनी लाँड्रिंगमधील कथित सहभागासाठी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) खटला चालवण्यासाठी ईडीला परवानगी दिली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, ईडीनं दिल्लीच्या नायब राज्यपालांना पत्र लिहित केजरीवाल हे कथित दारू घोटाळ्यातील 'मुख्य सूत्रधार' असल्याचं म्हटलं होतं. ईडीच्या पत्रानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल विजय कुमार सक्सेना यांनी केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यासह इतरांविरुद्ध ईडीनं दाखल केलेलं आरोपपत्र बेकायदेशीर असल्याच म्हटलं होते. तेव्हापासून अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालविण्याची प्रक्रिया न्यायालयीन खटल्यांमुळे प्रलंबित राहिली होती.
- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज विधानसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " आज मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. संपूर्ण दिल्लीतील माझ्या अनेक माता-भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासोबत येणार आहेत. नामांकन करण्यापूर्वी, मी ईश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी वाल्मिकी मंदिर आणि हनुमान मंदिरात जाणार आहे".