नवी दिल्ली ED Arrest Arvind Kejriwal : अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) टीम चौकशीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. दिल्ली उच्च न्यायालयानं कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीची टीम त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. चौकशी केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केलीय. याबाबतची माहिती आप नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली.
'आप'चे कार्यकर्ते आक्रमक : ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दिल्लीत विविध ठिकाणी 'आप'च्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरू केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत. तसंच दिल्लीत विविध ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
सर्वोच्च न्यायालयात याचिका :केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. न्यायमूर्ती सुरेश कैत यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सुनावणीदरम्यान, ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर त्यांना सामान्य माणूस म्हणून समन्स पाठवलं होतं. दरम्यान, ईडीनं केलेल्या अटकेविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणीही आम्ही न्यायालयाकडं केली असल्याची प्रतिक्रिया आप नेत्या अतिशी यांनी दिली.
केजरीवाल यांच्याविरोधात पुरेसे पुरावे : सुनावणीदरम्यान केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, "ईडीनं उत्तर दाखल करण्यासाठी कितीही वेळ घेतल्यास केजरीवाल यांच्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ नये." न्यायालयानं ईडीकडून केजरीवाल यांच्याविरोधात पुरावे मागवले आहेत. यावर ईडीच्या वतीनं एएसजी एसव्ही राजू म्हणाले की, "अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळं त्यांना अटक होऊ शकते."