चंदीगड Farmer Protest In Delhi : शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं सरकारनं खबरदारी म्हणून सिंघू सीमा सील करण्यात आली आहे. इतकच नाही, तर दिल्ली ते हरियाणा आणि पंजाब सीमाही सील करण्यात आल्या आहेत. दिल्ली आणि अमृतसरकडं जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं त्रिस्तरिय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर रस्त्यावर खिळे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अंबाला पोलिसांनी केल्या सीमा सील :शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदची प्रशासनानं चांगलीच दखल घेतली आहे. अंबाला पोलीस प्रशासनानं शंभू टोल प्लाझा आणि सदोपूरच्या सीमा सील केल्या आहेत. सीमा सील केल्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पंजाबवरुन येणाऱ्या नागरिकांना बस चालक दोन किमी दूर थांबवल्यामुळं पायी जावं लागत आहे. तर लहान मुलांमुळे मोठा सामना करावा लागत आहे, असं नागरिकांनी सांगितलं आहे.
कोणीही पुढं जाऊ नये, असे सरकारचे आदेश :दिल्लीत शेतकऱ्यांनी मागील वर्षी केलेल्या आंदोलनात हिंसाचार झाला होता. त्यामुळं सरकारनं आता शेतकरी आंदोलनाची चांगलीच धास्ती घेतली आहे. 13 फेब्रुवारीला शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलनासाठी येत आहेत. त्यामुळं सरकारनं मोठी खबरदारी घेतली आहे. "कोणीही पुढं जाऊ नये, असं शासनाचे आदेश आहेत. त्यामुळं बॅरिकेडींग करण्यात येत आहे," अशी माहिती वाहतूक प्रभारी जोंगिंदर यांनी दिली आहे. तर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिरसा मिनी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बेठकीला निमलष्करी दलाचे अधिकारीही उपस्थित होते. "पंजाबच्या शेतकरी संघटनांनी दिल्लीत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं खबरदारी घेण्यात येत आहे," अशी माहिती पोलीस अधिक्षक हिमांशू गर्ग यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- शेतकरी आंदोलन पुन्हा सुरू होणार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा
- शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक, राजुर घाटातून घेतलं ताब्यात