नवी दिल्लीCar Hit in Market : पूर्व दिल्लीतील मयूर विहार फेज 3 भागात एका आठवडी बाजारात भरधाव कारनं अनेकांना चिरडलं. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. त्यांना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी 22 वर्षीय महिलेला मृत घोषित केलं. या अपघातात कार चालकही जखमी झालाय. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलंय. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. त्यात भरधाव कार लोकांना चिरडताना दिसत आहे. अपघातात बळी पडलेली महिला सीता देवी आपल्या कुटुंबासह खोडा कॉलनीत राहत होत्या. त्या बाजारात खरेदीसाठी आल्या असताना अपघातात मृत्यू झाला.
अपघातात 10 जण जखमी : पूर्व दिल्लीचे डीसीपी अपूर्व गुप्ता यांनी सांगितलं की, "बुधवारी रात्री 9:30 च्या सुमारास मयूर विहार फेज 3 परिसरातील बुध बाजार इथं एका वेगवान कारनं अनेकांना धडक दिली. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. त्यात बहुतांश महिलांचा समावेश आहेत. यातील सर्व जखमींना जवळच्या लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येतंय. या अपघातात कार चालकही जखमी झाला. त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आरोपीच्या कारचंही नुकसान झालं असून ती कार जप्त करण्यात आली. पोलिसांची पुढील कारवाई सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.