कोलकाता(पश्चिम बंगाल) Cyclone Remal Landfall : हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 'रेमल' चक्रीवादळ रविवारी पश्चिम बंगालमध्ये दाखल झालं आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील प्रदेश आणि बांगलादेशसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रेमाल चक्रीवादळामुळं बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात अत्यंत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारं वाहू लागले आहे. आंध्र प्रदेशच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, खोल दाबाचे उत्तर आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर 'रेमल' चक्रीवादळात रूपांतर झालं.
मुसळधार पाऊस, जोरदार वारं सुरू : पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात पाणी साचले आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यात विविध ठिकाणी NDRF, SDRF पथकं तैनात करण्यात आली आहेत. समुद्री किनाऱ्याजवळ न थांबण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. रेमाल चक्रीवादळ परिस्थितीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. जोरदार वारं वाहत असून, अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. काही रेल्वे स्टेशनवर तर चक्क रेल्वे गाड्या साखळीने बांधल्या आहेत.
हवामान खात्यानं म्हटलंय की, " 26 मे रोजी सकाळी वायव्येकडं आणि लगतच्या ईशान्य बंगालच्या उपसागरात आणि बांगलादेश आणि सागर बेट आणि खेपुपारा दरम्यानच्या आसपासच्या भागात ते जवळजवळ उत्तरेकडं सरकण्याची आणि तीव्र चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. तसंच ते पश्चिम बंगालचा किनारा ओलांडण्याची शक्यता असून 26 मे च्या मध्यरात्री ते ताशी 110-120 ते 135 किमी वेगानं वाऱ्यासह तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल."
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाब गेल्या 6 तासांत 12 किमी प्रतितास वेगानं उत्तरेकडं सरकलंय. 25 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजता त्याचं 'रेमल' चक्रीवादळात रूपांतर झालं. त्याचे केंद्र उत्तर आणि लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या जवळ आले. आयएमडीच्या अंदाजानुसार चक्रीवादळाची ताकद वाढतच जाईल. त्यामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारं आणि वादळाचा धोका निर्माण होईल.