गुवाहाटी Crime News : आसामच्या गुवाहाटीमध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीची खळबळजनक हत्या झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली, ज्या हॉटेलमध्ये सतत चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं पाळत ठेवली जाते.
तरुण-तरुणीला ताब्यात घेतलं : संदीप सुरेश कांबळे असं या व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी (5 फेब्रुवारी) गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलच्या खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एक तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतलंय. या दोघांना विमानतळावर जाताना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी या दोघांची स्वतंत्रपणे चौकशी केली आहे. एका पोलिस सूत्रानं सांगितलं की, हे दोघे कोलकाता येथून आले होते. ते रॅडिसन ब्लू हॉटेलच्या 9व्या मजल्यावरील खोली क्रमांक 907 मध्ये तळ ठोकून होते.
विष देऊन हत्या केल्याचा संशय : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी संदीप कांबळे याला हॉटेलमध्ये बोलावलं होतं. तेथे त्याचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीला अन्नासोबत विष देऊन हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा नसल्या तरी तोंडातून रक्त वाहत असल्याचं दिसलं. प्रेम त्रिकोणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. ही घटना सोमवारी दिवसाढवळ्या घडली.
दोन संशयित ताब्यात : कांबळे याच्या मृत्यूनंतर हे तरुण-तरुणी हॉटेलमधून निघून गेले. हॉटेलच्या हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांना खोलीत रक्ताची गुठळी दिसली आणि त्यांनी याची माहिती हॉटेलच्या अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलावणं धाडलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे छापा टाकला आणि सायंकाळी आजरा येथून दोन संशयितांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे वाचलंत का :
- नागपुरात घडले दुहेरी हत्याकांड, काही तासातच आरोपींना बेड्या
- नाष्टा केला नसल्यानं मुलानं केली आईची हत्या, बंगळुरुतील धक्कादायक घटना
- प्रियकराच्या मदतीनं बायकोनंच केला नवऱ्याचा खून; नवरा बेपत्ता झाल्याची दिली पोलिसात तक्रार