कानपूर :भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावस्कर यांच्या सासू पुष्पा मेहरोत्रा (85) यांचं शुक्रवारी कानपूर येथील राहत्या घरी निधन झालं. भारत-इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या कसोटीदरम्यान सुनील गावस्कर समालोचन करत असताना त्यांना निधनाची माहिती मिळाली. त्यानंतर ते रात्री उशिरा कानपूरला पोहोचले. पुष्पा मेहरोत्रा यांच्या पार्थिवावर भगवतदास घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लखनौहून कारनं कानपूर गाठलं : सुनील गावस्कर यांना घटनेची माहिती मिळताच ते विशाखापट्टणमहून थेट लखनौ विमानतळावर पोहोचले. त्यानंतर रात्री कारनं ते कानपुरात दाखल झाले. अंत्यसंस्काराच्या वेळी सुनील गावस्कर यांची पत्नी मार्चेलिन, त्यांच्या बहिणी तुनिशा तसंच मासूही उपस्थित होत्या. त्यामुळं गावस्कर यापुढं विशाखापट्टणम कसोटीचा भाग असणार नाहीत.
गावस्कारांचे सासरे चामड्याचे व्यापारी आहेत : पुष्पा मेहरोत्रा यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक तसंच त्यांच्या कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी धाव घेतली. गावस्कर यांचे सासरे चामड्याच्या व्यवसायात आहेत. त्यांचे सासरे बी.एल मेहरोत्रा हे कानपूरच्या मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते. गावसकर यांनी 1974 मध्ये बी.एल मेहरोत्रा यांची मोठी मुलगी मार्शनिलशी लग्न केलं आहे. 1973 मध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान दोघांची भेट झाली होती.