नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : काँग्रेस पक्षानं दिल्लीतील तीन लोकसभा मतदार संघाच्या जागांसाठी आपल्या उमेदवारांची रविवारी घोषणा केली आहे. विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला ईशान्य दिल्लीतून काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. तर चांदणी चौक मतदार संघातून काँग्रेसनं जे पी अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर पश्चिम दिल्लीतून उदित राज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसनं कन्हैया कुमारला उमेदवारी दिलेल्या दोन वेळा भाजपा खासदार असलेल्या मनोज तिवारींच्या समोर तगडं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे ईशान्य दिल्लीत बिहारी आणि यूपीमधील मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दोन्ही बिहारी उमेदवारांना उमेदवारी दिल्यानं या मतदार संघात मोठा रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.
कन्हैया कुमारला बेगुसरायमधून मिळणार होती उमेदवारी :काँग्रेस नेते कन्हैया कुमारला बिहारमधील बेगुसराय मतदार संघातून उमेदवारी जाहीर करणार होते. मात्र राजदनं हा मतदार संघ सीपीआयला दिला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी कन्हैया कुमारला दिल्लीतून उमेदवारी बहाल केली आहे. कन्हैया कुमार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाला होता. त्यामुळे कन्हैया कुमारला काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची पहिली पसंद असल्याचं राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केलं. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांना ईशान्य दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र लवली यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनाही तिकीट मिळालेलं नाही.