रांची (झारखंड) Champai Soren Govt : मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारनं सभागृहात आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. झारखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनात त्यांनी फ्लोर टेस्ट पास केली आहे.
10 दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश : हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर जेव्हा चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर राज्यपालांनी त्यांना 10 दिवसात सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. 5 फेब्रुवारीला त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आणि या विशेष अधिवेशनात चंपाई सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला.
सत्ताधारी पक्षाला एकूण 47 मते : चंपाई सोरेन यांनी विधानसभेत आधीच स्पष्ट केलं होतं की, त्यांच्या सरकारकडे बहुमताचा आकडा आहे. बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनातही त्यांनी बाजी मारली आहे. विधानसभेत झालेल्या मतदानात सत्ताधारी पक्षाला एकूण 47 तर विरोधकांना एकूण 29 मतं मिळाली. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील फ्लोर टेस्टच्या या विशेष सत्रात सहभागी होण्यासाठी आले होते. सभागृहात बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चंपाई सोरेन अतिशय आनंदी आणि उत्साहित दिसत होते.
चंपाई सोरेन यांनी सुरक्षित केलं मुख्यमंत्रिपद : सध्या झारखंड मुक्ती मोर्चाचे 29, काँग्रेसचे 17, सीपीआय (एमएल) आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे एकमेव आमदार सत्यानंद भोक्ता यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसकडे 17 आमदार असून त्यापैकी आलमगीर आलम यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या 29 सदस्यांपैकी चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या तिघांनी शपथ घेतली आणि सरकार स्थापन केलं. त्यानंतर त्यांना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. यासंदर्भात झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.
हेही वाचा:
- "माझ्या अटकेमागे राजभवनाचा हात, अटकेची स्क्रिप्ट आधीच लिहिली होती", हेमंत सोरेन यांचे गंभीर आरोप
- पुणे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
- द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी मौलाना अजहरीला मुंबईतून अटक; पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्यामुळं जमावावर गुन्हा दाखल