मुंबई NBW Against Vijay Mallya :इंडियन ओव्हरसीज बँकेचं (IOB) 180 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयानं फरार उद्योगपती विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केलं आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस पी नाईक निंबाळकर यांनी 29 जून रोजी विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वारंट जारी केलं. याबाबतचा सविस्तर आदेश सोमवारी जाहीर करण्यात आला आहे.
फरार विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वारंट :इंडियन ओव्हरसीज बँकेच्या 180 कोटी रुपये बुडल्याच्या प्रकरणात सीबीआयनं विशेष न्यायालयात बाजू मांडली. सीबीआयनं विजय मल्ल्या फरार असल्याबाबतची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे विशेष न्यायालयानं " विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करणं योग्य आहे. विजय मल्ल्या समोर येण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट काढणं गरजेचं आहे," असं न्यायालयानं नमूद केलं. "किंगफिशर कंपनी बंद पडली आहे. किंगफिशर कंपनीनं देयकं चुकवून सरकारी बँकांचं 180 कोटी रुपयांचं नुकसान केलं," अशी बाजू सीबीआयच्या वतीनं न्यायालयात मांडण्यात आली.