महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रशांत किशोर यांच्यासह 700 आंदोलकांवर गुन्हा दाखल; बिहारमध्ये कशामुळे आज बंदची हाक? - BPSC STUDENT PROTEST

पाटणा येथे झालेल्या आंदोलनामुळे जन सुराजचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यासह 700 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेनं आज बिहार बंदची हाक दिली.

prashant kishor News
प्रशांत किशोर आंदोलनात सहभागी (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2024, 10:38 AM IST

पाटणा :बिहारमध्ये बीपीएससी प्रिलिम्सच्या कथित पेपरफुटीवरून मोठा वादंग निर्माण झाला. आंदोलक विद्यार्थ्यांवर रविवारी लाठीचार्ज झाल्यानं विद्यार्थी संघटनेनं (AISA) आज बिहार बंदची हाक दिली आहे. रविवारी गांधी मैदानावर झालेल्या आंदोलनात नियमांचे उल्लंघन केल्यानं जन सुराजचे अध्यक्ष प्रशांत किशोरसह विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल केला. दुसरीकडं काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी भाजपाच्या डबल इंजिन सरकारकडून विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा टोला लगावला आहे.

कशामुळे करण्यात आली कारवाई: माजी राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी बीपीएससी प्रिलिम्स परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रविवारी आंदोलनात भाग घेतला. यावेळी मैदानात विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानं प्रचंड गदारोळ झाला. या प्रकरणी पाटणा जिल्हाधिकाऱ्यानं प्रशांत किशोर यांच्यासह 700 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आंदोलनाला परवानगी नाही :बीपीएससी उमेदवारांच्या निदर्शनाबाबत पाटणाचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी माध्यमांना सांगितले, " गांधी मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली नव्हती. असे असतानाही विद्यार्थी गांधी मैदानावर जमा झाले. जिल्हा प्रशासनाने गांधी मैदानावरील कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा निदर्शनासाठी ४५ दिवस अगोदर अर्ज करणे बंधनकारक असते. मात्र, त्या पद्धतीनं कोणतेही परवानगी घेण्यात आली नव्हती. नियमांचे उल्लंघन करत बीपीएससीचे उमेदवार, शिक्षक आणि जन सुराजच्या समर्थक बॅरिकेड्स तोडून गांधी मैदानात दाखल झाले.

आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणार होते: पाटणा गांधी मैदानात झालेल्या आंदोलनानंतर प्रशांत किशोर उमेदवारांसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घराच्या दिशेनं कूच करत होते. प्रशासन विद्यार्थ्यांना वारंवार समजावून सांगत होते. मात्र, ते मानायला तयार नव्हते. आंदोलक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायचे होते. शेवटपर्यंत विद्यार्थी मुख्यमंत्र्यांशिवाय कोणाला न भेटण्यावर ठाम राहिले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर केला. काही उमेदवारांनी पोलिसांवर दगडफेकही केली. त्यानंतर पोलिसांनी जेपी गोलांबर ते रामगुलाम चौकापर्यंत उमेदवारांचा पाठलाग केला.

प्रशांत किशोर पळून गेल्याची चर्चा :आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच पाण्याचे फवारे त्यांच्यावर सोडले. विद्यार्थ्यांना आवाहन करणारे प्रशांत किशोर हे लाठीचार्जपूर्वी पळून गेल्याचं बोललं जात आहे. तुमचे नेते परतले आहेत. तुम्हीदेखील आता परत जा, असे पोलिसांनी विद्यार्थ्यांना माईकवरून आवाहन केलं. मात्र, मागण्या मान्य न झाल्यानं आणि प्रशांत किशोर गेल्यानं आंदोलक संतप्त झाले. प्रशांत किशोर यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी आमचा वापर केला, असा विद्यार्थ्यांनी दावा केला.

  • पेपरफुटीचा काय आहे वाद?-पाटणा येथील बापू भवन परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांनी पेपर फुटल्याचा आरोप करत गोंधळ घातला होता. यानंतर बिहार सरकारनं केंद्राची परीक्षा रद्द करून पुन्हा ४ जानेवारी रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आलं. मात्र, संपूर्ण राज्यातील उमेदवारांसाठी फेरपरीक्षा घ्या, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details