पाटना Bihar Political Crisis :बिहारमध्ये मागील दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा आज (28 जानेवारी) शेवट झालाय. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय जनता दल आणि इंडिया आघाडीची साथ सोडून ते आता भाजपासोबत नवा घरोबा करणार आहेत. तसंच आजच ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज (28 जानेवारी) पूर्णिया येथील काँग्रेस कार्यालयात बैठक होत आहे. या बैठकीला सर्व 19 आमदार उपस्थित राहून पुढील रणनीती तयार करतील, अशी अपेक्षा आहे.
नितीश कुमारांना 128 आमदारांचा पाठिंबा : बैठकीनंतर आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. नितीश कुमार यांच्या एनडीएमध्ये पुनरागमन करण्याबाबत भाजपाकडून काही वेळात औपचारिक घोषणा केली जाईल, असं मानले जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश यांना पाठिंबा देण्यास औपचारिक मान्यता दिली जाईल. ज्यामध्ये नितीश कुमार यांच्या JDU मधील 45, भाजपाचे 78, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे 4 आणि एका अपक्ष आमदारांसह एकूण 128 आमदारांचे समर्थन पत्र राज्यपालांना सुपूर्द केले जाणार आहेत.
पाटण्यात भाजपाची महत्त्वाची बैठक :भाजपा कार्यालयात सुरू असलेली बैठक संपली आहे. सम्राट चौधरी हे भाजपा विधीमंडळ पक्षाचे नेते असतील. तर विजय सिन्हा विधानसभेत एनडीएचे उपनेते असतील. तसंच बैठकीत काेणते निर्णय घेण्यात आले हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, नितीश कुमार यांच्या एनडीए प्रवेशाची स्क्रिप्ट भाजपाच्या प्रदेश कार्यालयात लिहिली गेली असून नितीशकुमारांच्या स्वागतासाठी भाजपा सज्ज आहे. अटलबिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांव्यतिरिक्त केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, संजय जैस्वाल, मंगल पांडे, विजय सिन्हा, हरी साहनी आणि सम्राट चौधरी उपस्थित होते.
एनडीए सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर-भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत, बिहारच्या आमदारांनी भाजप, JD(U) आणि इतर मित्रपक्षांसह राज्यात एनडीए सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. विधीमंडळ पक्षनेतेपदी सम्राट चौधरी तर उपनेतेपदी विजय सिन्हा यांची निवड करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने बिहारमध्ये भाजप, JD(U) आणि इतर NDA मित्र पक्षांसोबत लोकांच्या कल्याणासाठी एनडीए सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
हेही वाचा -
- 'महागठबंधन' तोडून कशामुळे दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा? नितीश कुमार यांनी 'हे' सांगितलं कारण
- बिहारच्या राजकीय संघर्षात लालू यांच्या मुलीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, भाऊ तेजस्वीचं केलं कौतुक
- नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा, भाजपाबरोबर करणार सत्ता स्थापना