गुवाहाटी Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या आसाममध्ये आहे. दरम्यान, राज्यातील सोनितपूर जिल्ह्यात जमावानं राहुल गांधी यांची बस अडवली. यावेळी उपस्थित लोकांन मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. हे पाहून राहुल गांधी बसमधून खाली उतरले. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना परत बसमध्ये बसण्यास सांगितलं.
सोशल मीडिया टीमच्या सदस्यांना मारहाण : गर्दीतल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीचे झेंडे हातात धरले होते. काही लोक राहुल गांधींच्या बससमोरही आले. यात्रेला कव्हर करणार्या व्लॉगरचा कॅमेरा, बिल्ला आणि इतर उपकरणं हिसकावून घेतल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. "पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्यांनाही मारहाण करण्यात आली. आम्ही पोलिसांना कळवलं असून अतिरिक्त पोलिस अधीक्षक सध्या घटनास्थळी आहेत", असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट केलं की, प्रेमाचं दुकान सर्वांसाठी खुलं आहे. त्यांनी एक व्हिडिओही शेअर केलाय.