बंगळुरू: बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरलेल्या तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मालकीचं सोनं आणि हिऱ्यांचे दागिने कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकारकडे हस्तांतरित करावेत, असा आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोमवार दिले आहेत. दागिने सध्या न्यायालयाच्या ताब्यात आहेत. ते तिजोरीत ठेवलेले आहेत. जयललिता यांचे नातेवाईक जे दीपा यांनी जप्त केलेल्या मालमत्तेवर आपला अधिकार आहे, असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा विषय चर्चेत आला होता. आरटीआय कार्यकर्ते टी. नरसिंह मूर्ती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली. त्यानंतर न्यायालयाने गृह विभागाचे सचिव आणि कर्नाटकच्या पोलीस विभागाला जयललिता यांच्या वस्तू तामिळनाडू सरकारच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले.
डीडीच्या स्वरूपात 5 कोटी रुपये देण्याचे निर्देश : विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. ए. मोहन म्हणाले, 'माझे असे मत आहे की, दागिन्यांचा लिलाव करण्याऐवजी ते तामिळनाडू राज्याच्या गृह विभागाकडे हस्तांतरित करणे योग्य असेल', त्यानुसार त्यांनी पोलिसांसह सचिव दर्जाच्या व्यक्तींची नियुक्ती करून दागिने गोळा करण्याचे निर्देश दिले. तसंच, जयललिता यांच्यावरील बेकायदेशीर संपत्ती प्रकरणाच्या चौकशीसाठी तामिळनाडू सरकारनं कर्नाटक सरकारला डीडीच्या स्वरूपात 5 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी, या खटल्यातील राज्य सरकारचे विशेष अभियोक्ता किरण एस जावळी यांनी जयललिता यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा तपशील न्यायालयात सादर केला.
आरटीआय कार्यकर्ते नरसिंह मूर्ती यांची याचिका : 27 सप्टेंबर 2014 रोजी बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने बेकायदेशीर संपत्तीप्रकरणी जयललिता यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तसंच, जयललिता यांच्या जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू आरबीआय, एसबीआय किंवा सार्वजनिक लिलावाद्वारे विकल्या पाहिजेत. ही रक्कम दंडाच्या रकमेत समायोजित करावी, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर आरटीआय कार्यकर्ते नरसिंह मूर्ती यांनी जयललिता यांच्या सामानाची विल्हेवाट लावण्यासाठी केलेल्या कारवाईची माहिती देण्याबाबत न्यायालयात दाद मागितली. त्यावर सुनावणी करणाऱ्या न्यायालयानं हा निर्णय दिला.
जयललिता यांच्या मालकीच्या काय आहेत वस्तू? : 7040 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व हिऱ्याचे 468 प्रकारचे दागिने, 700 किलो वजनाचे चांदीचे दागिने, 740 महागड्या चप्पल, 11344 रेशमी साड्या, 250 शाल, 12 रेफ्रिजरेटर, 10 टीव्ही संच, 8 व्हीसीआर अशी जयललिला यांची मालकीची मालमत्ता आहे. त्याचबरोबर 4 सीडी, व्हिडीओ प्ले, 2 कॅमेरा, 1 व्हिडिओ डेक जयललिता यांच्याकडून 24 टू इन वन टेप रेकॉर्डर, 1040 व्हिडिओ कॅसेट, 3 लोखंडी लॉकर, 193,202 रुपये रोख आणि इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.