लखनऊ Badaun Double Murder : दोन मुलांचा गळा चिरुन खून करणाऱ्या साजिदचा पोलिसांनी एन्काउंटर केला. त्यानंतर पोलिसांनी साजिद हा मानसिक रुग्ण असल्याचं स्पष्ट केलं होतं. मानसिक रुग्ण असल्यानं साजिद असाच हिंसक होत होता, असा दावा पोलिसांनी केला. मात्र त्याच्या जवळच्या मित्रांनी आणि पत्नीसह आईनं तो कधीच कोणाशी वाद घालत नव्हता, असा दावा केलाय. त्यामुळे पोलिसांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि त्याच्या घरच्यांनी केलेल्या दाव्यात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे दोन चिमुकल्यांच्या खुनाचं गूढ वाढलं आहे.
पोलिसांच्या दाव्यात अनेक संशयास्पद माहिती :दोन मुलांचा गळा चिरुन खून करुन साजिद पळून जात होता. यावेळी पोलिसांनी त्याला एन्काउंटर करुन ठार केलं आहे. त्याचा भाऊ जावेद याच्यावर पोलिसांनी 25 हजाराचं बक्षीस ठेवलं होतं. मात्र जावेदनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. घटनेनंतर पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेत साजिद मानसिक रुग्ण होता, अशी माहिती माध्यमांना दिली आहे. जावेदच्या हवाल्यानं पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मात्र तरीही साजिदनं चिमुकल्यांचा गळा चिरुन खून का केला, या प्रश्नाचं उत्तर बाकीचं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनेक बाबींमध्ये तफावत असल्याचं आढळून येत आहे.