नवी दिल्ली Ram Mandir Satellite Photo : अयोध्येतील राम मंदिरात उद्या म्हणजेच 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहतील. त्यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) अंतराळातून घेतलेला भव्य राम मंदिराचा फोटो शेअर केला.
स्वदेशी उपग्रहानं फोटो काढला : विशेष म्हणजे, अंतराळातून पहिल्यांदाच राम मंदिर आणि अयोध्येचं छायाचित्र घेण्यात आलंय. या चित्रासाठी इस्रोनं भारतीय रिमोट सेन्सिंगचा (IRS) स्वदेशी उपग्रह वापरला. या चित्रात केवळ राम मंदिरच दिसत नाही तर अयोध्या शहर देखील दिसतंय. चित्रात अयोध्या रेल्वे स्टेशन, राम मंदिराच्या उजव्या बाजूचा दशरथ महल आणि वरच्या डाव्या बाजूची सरयू नदी देखील दिसत आहे.
महिन्याभरापूर्वीचा फोटो : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा फोटो महिनाभरापूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2023 रोजी काढण्यात आला होता. तेव्हापासून अयोध्येतील हवामानात बराच बदल झालाय. दाट धुक्यामुळे उपग्रहाला पुन्हा छायाचित्र घेता आलं नाही. भारताचे सध्या 50 हून अधिक उपग्रह अवकाशात आहेत. हे उपग्रह इतके शक्तिशाली आहेत की ते एक मीटरपेक्षा कमी आकाराच्या वस्तूंचेही स्पष्ट फोटो घेऊ शकतात.
राम मंदिराला फुलांनी सजवलं : 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा अभिषेक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराला फुलांनी आणि विशेष रोषणाईनं सजवण्यात आलंय. मंदिराच्या गर्भगृहात रामाची नवीन मूर्ती ठेवण्यात आली असून, ही मूर्ती कर्नाटकाच्या म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे.
हे वाचलंत का :
- केएस भरतनं प्रभू श्रीरामाला समर्पित केलं शतक, सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
- सचिन, विराट, विश्वनाथन आनंद; रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेला कोणकोणते खेळाडू येणार? जाणून घ्या संपूर्ण यादी