अयोध्या Ram Mandir Timings : अयोध्येतील राम मंदिरात भाविकांची होणारी गर्दी बघून मंदिराच्या दर्शनाची वेळ वाढवण्यात आलीय. आता भाविकांना रात्री 10 ऐवजी रात्री 11 वाजेपर्यंत रामाचं दर्शन घेता येणार आहे. याशिवाय व्हीव्हीआयपींना येण्याच्या 10 दिवस आधी प्रशासन, पोलिस किंवा ट्रस्टला कळवावं लागेल. त्याचबरोबर अयोध्येतील गर्दी लक्षात घेता तैनात करण्यात आलेल्या फोर्सची ड्युटी आता 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलीय.
मंदिर 11 वाजेपर्यंत राहणार : डीजी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत जमलेली प्रचंड गर्दी पाहता रात्री गर्दी संपेपर्यंत मंदिराचे दरवाजे उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिराचे दरवाजे बंद करण्याची वेळ 11 वाजेपर्यंत असेल. याशिवाय अयोध्येत येणाऱ्या सर्व व्हीव्हीआयपींना 10 दिवस आधी जिल्हा प्रशासन, पोलिसांना किंवा ट्रस्टला कळवावं लागेल. जेणेकरुन व्हीव्हीआयपींसाठी व्यवस्था करता येईल. तसंच अयोध्येत तैनात असलेल्या जवानांची ड्युटी 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय.
गर्दी बघून मोठा निर्णय :मंगळवारी अयोध्येत पाच लाख भाविकांनी दर्शन घेतलं. अयोध्येत भाविकांची सध्या मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. यामुळं स्थानिक प्रशासनासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मंगळवारपर्यंत अयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनाचा कालावधी रात्री 10 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आला होता. मात्र, बुधवारी वाढलेल्या गर्दीमुळं हा कालावधी वाढवून आता रात्री 11 वाजेपर्यंत करण्यात आलाय. याशिवाय व्हीव्हीआयपींसाठीही विशेष आवाहन करण्यात आलंय.
मंदिर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत खुलं राहणार :मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिर दररोज सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार आहे. पहाटे 4:30 ते 5 या वेळेत रामललाची मंगल आरती होईल. याशिवाय सकाळी 6.30 वाजता शृंगार आरती आणि दुपारी 12 वाजता भोग आरती होणार आहे. याशिवाय सायंकाळी 7.30 वाजता आरती होईल. दुपारी 1 ते 3 या वेळेत मंदिर बंद राहणार आहे. या काळात दरवाजे बंद राहतील.
हेही वाचा :
- श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- हजार वर्ष टिकेल असं हे भव्यदिव्य 'राम मंदिर'; बांधण्यासाठी आतापर्यंत 'इतका' आलाय खर्च
- राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा किती वाजता सुरू होईल? दर्शन आणि आरतीच्या वेळा काय? जाणून घ्या सर्वकाही