रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास अयोध्या :अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. शुक्रवारी (19 जानेवारी) रामलल्लाचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये रामाचे डोळे उघडलेले दिसत आहेत. आता या फोटोवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
आचार्य सत्येंद्र दास यांची नाराजी : रामलल्लाच्या या फोटोवर रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी नाराजी व्यक्त केली. "कोणत्याही मंदिराच्या गर्भगृहात मूर्तीचा अभिषेक करण्यापूर्वी विविध विधी केले जातात. यामध्ये देवतेच्या पूजेशी संबंधित प्रक्रियेचा समावेश आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डोळ्यावर पट्टी बांधून राहते. जो फोटो व्हायरल होत आहे तो भगवान श्रीरामाच्या खऱ्या मूर्तीचा फोटो नाही असं दिसतं. तसं असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे", असं आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.
मूर्तीचा फोटो व्हायरल करणं अयोग्य : "प्राण प्रतिष्ठेपूर्वी पट्टी न उघडता आणि बिना मेकअपच्या मूर्तीचा फोटो व्हायरल करणं अयोग्य आहे. याची चौकशी झाली पाहिजे. प्राण प्रतिष्ठेचा संपूर्ण विधी झाल्यानंतर शुभ मुहूर्तानुसार मूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी काढून नंतर तिचं दर्शन होतं", असं आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितलं. "असं घडलं असेल तर त्याची चौकशी केली जाईल", असंही आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.
अयोध्येत बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी : 22 जानेवारीला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी 16 जानेवारीपासून सहा दिवसीय विधी सुरू करण्यात आले. आज विधीचा पाचवा दिवस आहे. आजपासून सोहळ्याला आमंत्रित पाहुणे अयोध्येला पोहोचू लागले आहेत. अयोध्येत बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे अयोध्येत फक्त अशा लोकांनाच प्रवेश मिळेल, ज्यांना रामलल्लाच्या अभिषेकाचं निमंत्रण आहे. स्थानिक लोकांना पास देण्यात आले आहेत, जेणेकरुन त्यांना कोणताही त्रास येऊ नये.
हे वाचलंत का :
- नागपुरच्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबत 'राम आयेंगे' गाण्यावर डान्स, व्हिडिओ तुफान Viral
- राम जन्मभूमीचा वाद कोणामुळं सुरू झाला? वादग्रस्त जागेभोवती कुंपण कोणी अन् का लावलं?; जाणून घ्या A टू Z इतिहास
- 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर