नवी दिल्ली Donald Trump Firing :अमेरिकेतील रॅलीदरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानं जागतिक नेत्यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये ते थोडक्यात बचावले. मात्र, या हल्ल्यात त्यांच्या दोन समर्थकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत धोकादायक मानलं जातंय. पण ट्रम्प यांच्यासारख्या मोठ्या जागतिक नेत्यावर असा प्राणघातक हल्ला होण्याची, ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही जगभरातील विविध देशांतील अनेक लोकप्रिय नेत्यांवर असे प्राणघातक हल्ले झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात काहींचा मृत्यूही झाला आहे. त्याबाबत आज आपण काही नेत्यांची माहिती घेणार आहोत. ज्यांच्यावर असे प्राणघातक हल्ले झाले आहेत.
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (15 मे 2024) : या वर्षी मे महिन्यात स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. हँडलोवा येथील एका सांस्कृतिक केंद्रात सभेनंतर लोकांना अभिवादन करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर, त्याला जखमी अवस्थेत बांस्का बायस्ट्रिका येथील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं होतं, जिथं त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (जुलै 2022) :जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण जग हादरलं होतं. नारा शहरात रॅली काढत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन राऊंड गोळीबार केला होता. ज्यामध्ये एक गोळी त्याच्या छातीतून गेली होती. तर, दुसरी गोळी त्याच्या मानेला लागली होती.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (3 नोव्हेंबर 2022) :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर रॅली सुरू असताना जीवघेणा हल्ला झाला होता. यात त्यांच्या पायाला गोळी लागली होती. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर उपचार करण्यात आल होते. या हल्ल्यात त्याच्यासह अन्य १४ जण जखमी झाले होते.
बेनझीर भुट्टो, पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान (27 डिसेंबर 2007) :2007 मध्ये पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी त्या पाकिस्तानातील रावळपिंडी येथे एका निवडणूक रॅलीत भाषण करून परतत होत्या. हा हल्ला अगदी जवळून करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला होता.
हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोइस (7 जुलै 2021) : हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईस यांच्या हत्येची कहाणी अतिशय धक्कादायक आहे. त्यांची हत्या झाली तेव्हा, ते पोर्ट-ऑ-प्रिन्स येथील त्यांच्या खाजगी निवासस्थानी होते. यावेळी 28 भाडोत्री सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. पुढील तपासात त्यांच्या हत्येचा कट त्यांचीच पत्नी मार्टिन मोईस हिनं रचल्याचं उघड झालं होतं. त्यांनी माजी पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांच्यासोबत मिळून या हत्येचा कट रचला होता. मात्र, या हल्ल्यात मार्टिन मोइसही जखमी झाल्या होत्या.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (31 ऑक्टोबर 1984) : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनं सर्वांनाच धक्का बसला होता. या हल्यामुळं भारतात दंगे झाले होते. तसंच इंदिरा गांधींना त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या घातल्या होत्या. त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या हल्ल्या मागचं कारण ऑपरेशन ब्लू स्टार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
52 वर्षांनंतर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर हल्ला : अमेरिकेत 52 वर्षांनंतर राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर हल्ला झाला आहे. यापूर्वी 1972 मध्ये जॉर्ज सी. वॉलेस यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. ते अमेरीकेचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. एका शॉपिंग सेंटरमध्ये त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. यानंतर ते मरेपर्यंत व्हील चेअरवरच राहिले. यापूर्वी 1972 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट एफ केनेडी यांच्यावर हल्ला झाला होता. लॉस एंजेलिसमध्ये प्रचार आटोपून ते परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.
'हे' वाचलंत का :
- डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानं पंतप्रधानांसह राहुल गांधींनी व्यक्त केला निषेध, वाचा काय म्हणाले? - Donald Trump News
- डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानं पंतप्रधानांसह राहुल गांधींनी व्यक्त केला निषेध, वाचा काय म्हणाले? - Donald Trump News
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार; थोडक्यात बचावले, पाहा घटनेचा व्हिडिओ - DONALD TRUMP NEWS