नवी दिल्ली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना आम आदमी पक्षाच्या आमदारांना लाच देण्याची ऑफर केल्याच्या आरोपावरून चौकशीत सहभागी होण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळं दिल्लीतील 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केजरीवाल यांच्या घरातून एसीबीची टीम परतली. केजरीवाल यांना नोटीस बजावली व ती स्विकारण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱयांनी दिली.
काय आहे नेमका आरोप? : अरविंद केजरीवाल यांनी नाव न घेता भाजपावर उमेदवार विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. केजरीवाल यांनी दावा केला की, "'आप'च्या आमदारांना आणि उमेदवारांना फोनवरून प्रत्येकी 15 कोटी रुपयांच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. या मुद्द्यावर सर्व 70 उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली होती. आमचे आमदार, उमेदवार विकत घेतले जाण्याची शक्यता आहे."
व्हीके सक्सेना यांनी दिले चौकशीचे आदेश : अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांनंतर भाजपानं नायब राज्यपाल (एलजी) व्हीके सक्सेना यांना पत्र लिहून आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. व्हीके सक्सेना यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर एसीबीचे पथक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं. मात्र, पथकाला आत प्रवेश देण्यात आला नाही. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी त्यांना कायदेशीर नोटीस मागितली.
'आप' आणि भाजपात आरोप, प्रत्यारोप : गुरुवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी आरोप केला होता की, "भाजपाला आमचे उमेदवार विकत घ्यायचे आहेत आणि त्या बदल्यात ते प्रत्येकी 15 कोटी रुपये देऊ करत आहेत." या खळबळजनक आरोपानंतर अरविंद केजरीवाल यांनीही प्रतिक्रिया दिली आणि भाजपावर सडकून टीका केली. अशा आरोपांबाबत निवडणूक निकाल येण्यापूर्वी भाजपा नेत्यांनी ही पराभवाची भीती असल्याचं सांगितलं. तसेच आरोप निराधार असल्याचंही म्हटलं आहे. शुक्रवारी सकाळी भाजपा नेते विष्णू मित्तल यांनी या संदर्भात नायब राज्यपालांकडं तक्रार केली आणि चौकशीची मागणी केली.
हेही वाचा -महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक, राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह