नवी दिल्ली :भाजपाच्या नेत्या बांसूरी स्वराज यांनी दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर एका मुलाखतीत आरोप केले. त्यामुळे सत्येंद्र जैन यांनी भाजपा खासदार बांसूरी स्वराज यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. आपली प्रतिमा मलिन केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला आहे. यासाठी त्यांनी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली आहे.
बांसूरी स्वराज यांच्याविरोधात मानहानीची तक्रार :दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांनी भाजपा खासदार बांसूरी स्वराज यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली. एका मुलाखतीत बांसूरी स्वराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सत्येंद्र जैन यांची प्रतिमा खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत बांसूरी स्वराज यांनी 5 ऑक्टोबर 2023 ला एका मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सत्येंद्र जैन यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याची नाणी जप्त केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या मुलाखतीत बांसूरी स्वराज यांनी कोणताही पुरावा नसतानाही बदनामीकारक विधानं केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला. ही मुलाखत लाखो नागरिकांनी पाहिली आणि सोशल माध्यमांवर शेयर केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला.