तिरुअनंतपूर Cow Saves Family in Wayanad Land Slide :केरळमधील भूस्खलनात आतापर्यंत 116 नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली. केरळमध्ये आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दुसरीकडं केरळमधील वायनाड इथं झालेल्या भूस्खलनातून एका गायीमुळे कुटुंब बचावल्याची मोठी आशादायक घटना समोर आली आहे. गायीमुळे कुटुंब बचावल्याची घटना पुढं आल्यानं या गायीचं मोठं कौतुक करण्यात येत आहे. विनोद, जयश्री, सिद्धाराजू, महेश आणि गौरम्मा अशी या बचावलेल्या नागरिकांची नावं आहेत.
चुरल माले इथल्या घरात होतं कुटुंब :केरळमधील वायनाड इथल्या भूस्खलनातून चामराजनगरमधील हे कुटुंब गायीच्या सतर्कतेमुळे काही सेकंदाच्या फरकानं वाचलं आहे. चामराजनगरमधील चुरल माले इथले विनोद, जयश्री, सिद्धाराजू, महेश आणि गौरम्मा हे भूस्खलनात बचावले आहेत. विनोदची पत्नी नर्सिंग मदर असून प्रविदा, सासू लक्ष्मी आणि पुत्तसिद्धम्मा मेपडी इथं होते. विनोद आणि इतर चार जण चुरल टेकडीवर होते. चुरल माले आणि मेपडी हे ६ किमी अंतरावर आहेत. मेपडीत असलेल्या प्रविदा, लक्ष्मी, पुत्तसिद्धम्मा आणि 2 महिन्यांचं बाळ सुखरूप बचावलं असून चे चामराजनगरला पोहोचलं.
गायीच्या सतर्कतेमुळे बचावलं कुटुंब : चुरल माले इथल्या घरात विनोद यांचं कुटुंब झोपलेलं होतं. यावेळी गोठ्यातील गाय जोरजोरात हंबरत होती. गाय जोरजोरात हंबरत असल्यानं विनोद यांना जाग आली. त्यामुळे त्यांनी गायीला काय झालं म्हणून पाहण्यासाठी गोठ्याकडं धाव घेतली. यावेळी गाईचे डोळे भरून आल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी लगेच घरातील नागरिकांना उठवलं आणि टेकडीच्या माथ्यावर धाव घेतली. यावेळी त्यांनी टेकडीवर धाव घेतल्यानंतर काही वेळातचं भूस्खलनाची घटना घडली. विनोद यांचं घर आणि वाहन ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. त्यांच्या घराजवळील पूलही दोन भागात विभागला गेला आहे. विनोद यांनी तत्काळ मेपाडी इथं असलेल्या त्यांच्या पत्नीला सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितलं. त्यामुळे प्रविदा, श्रीलक्ष्मी आणि पुत्तसिद्धम्मा सुरक्षित स्थळी गेले. त्यानंतर त्यांनी कारनं चामराजनगर गाठलं.
जवानांकडून बचावकार्य : गायीनं कुटुंबाला धोक्याची सूचना दिल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यात यश आलं. यावेळी विनोद यांची पत्नी प्रविदा यांनी सांगितलं की, "माझ्या पतीनं मला पूर आल्याची माहिती फोन करुन सांगितली. ते म्हणाले, पूर आला आहे. आपलं सगळं घर वाहून जात आहे. आम्ही सगळे सुरक्षीत आहोत. यावर मी त्यांना विचारलं की, त्यांना भूस्खलनाची माहिती कशी मिळाली. यावर त्यांनी पहाटे 1.45 वाजतापासून घरातील गाय जोरजोरात हंबरत होती. गाय का हंबरते, हे पाहण्यासाठी ते गोठ्यात गेले. मात्र यावेळी गोठ्य़ात पाणी साचलंहोतं. गायीच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होतं. त्यामुळे ही धोक्याची पूर्वसूचना असल्याचा अंदाज बांधून त्यांनी टेकडीवर धाव घेतली, असं त्यांनी मला सांगितलं."
हेही वाचा :
- केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; 93 जणांचा मृत्यू, भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन - Massive landslides In Kerala