पिलीभीत :उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभीतमध्ये एसटीएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन वाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. तीन खलिस्तानवाद्यांनी गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस चौकीवर ग्रेनेडने हल्ला केला होता. त्यानंतर एसटीएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकानं खलिस्तानवादी असलेल्या परिसराला वेढा घातला अन् चकमकीत 3 खलिस्तानवाद्यांना ठार केलंय. ठार झालेले सर्व खलिस्तानवादी हे खलिस्तानी कमांडो फोर्सचे असल्याचं सांगण्यात येतंय. ठार झालेल्या खलिस्तानवाद्यांकडून दोन एके 47 रायफल, दोन ग्लॉक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आलीत.
पिलीभीतचे एसपी अविनाश पांडेंच्या नेतृत्वाखाली कारवाई : पिलीभीतच्या पुरनपूर कोतवाली भागात ही चकमक झालीय. ठार झालेल्या खलिस्तानवाद्यांमध्ये गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग ऊर्फ रवी आणि जसप्रीत सिंग ऊर्फ प्रताप सिंग यांचा समावेश आहे. चकमकीतील गोळीबारानंतर सर्व जखमी खलिस्तानवाद्यांना पुरनपूर सीएचसीमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. या घटनेबाबत यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले की, पिलीभीतचे एसपी अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलीय.