साईनाथ रुग्णालयातील डस्टबिनमध्ये स्त्री जातीचं मृत अर्भक आढळल्यानं खळबळ - Female Infant Found - FEMALE INFANT FOUND
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 24, 2024, 5:11 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Female Infant Found : शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या स्त्री प्रसूती वार्ड बाहेरच्या डस्टबिनमध्ये एक दिवसाचं स्त्री जातीचं मृत अर्भक आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
रात्रीस आणून टाकलं अर्भक : साईबाबा संस्थानमार्फत चालवण्यात येणाऱ्या साईनाथ रुग्णालयातील महिला प्रसूती गृहाच्या शेजारी असलेल्या बाथरुमच्या बाहेरील कचराकुंडीत काल रात्री सात ते अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं एक दिवसाचं मृत अवस्थेतील अर्भक आणून टाकलं. रात्री कचराकुंडी रिकामी करताना लक्षात आल्यानं मोठी खळबळ उडाली. हे मृत अर्भक या ठिकाणी कसं आलं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातय.
सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत अर्भक टाकलं : साई संस्थानच्या रुग्णालयात रुग्णांची मोठी वर्दळ असते. येथे सुरक्षा रक्षकही असतात. असं असतानाही थेट रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटी असलेल्या स्त्री प्रसूती वार्डच्या बाहेर असलेल्या प्लास्टिकच्या कचराकुंडीत रात्री हे मृत अर्भक कोणीतरी आणून टाकल्याचा संशय आहे. कारण काल दिवसभरात या रुग्णालयात कोणतीही प्रसूती झाली नसल्यानं हे अर्भक या रुग्णालयातील नसल्याचं साई संस्थाननं सांगितलं.
प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न : याप्रकरणी रात्रीच साई संस्थानने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस आणि साई संस्थान दोघांकडूनही या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुग्णालयाला साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट देत प्रकरणाची माहिती घेतली आहे.