उत्तराखंडच्या बोगद्यातील कामगारांना वाचवणाऱ्या वकील हसनच्या घरावर दिल्ली प्रशासनानं चालविला बुलडोझर - Rat Miner Vakil Hasan
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 29, 2024, 7:30 PM IST
नवी दिल्ली Rat Miner Vakil Hasan : दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) ४१ मजुरांना वाचवणारे रॅट माइनर वकील हसन यांच्या घरावर बुधवारी बुलडोझर चालवला. वकील हसन म्हणाले की, "ते आणि त्यांची पत्नी घरी नसताना घरात लहान मुले होती. त्यावेळी डीडीएची टीम आली. त्यांनी मुलांसमोर घर पाडलं. उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यात सक्षम अभियंते आणि मशीन्सने हार पत्करली. तेव्हा वकील हसन यांच्या टीमनं जबाबदारी स्वीकारली होती. अवघ्या २६ तासांत बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात टीमला यश आलं होतं. डीडीएनं कोणतीही सूचना न देता ही कारवाई केल्याचा आरोप वकील हसन यांनी केला आहे. याशिवाय घरात ठेवलेल्या वस्तूही फेकून दिल्या होत्या. त्यांनी सरकारकडे कुटुंबासाठी घर मागितलं होतं. पण ते मिळालं नाही. पण, त्यांचं छोटंसं घरही बुलडोझरनं तोडलं गेलं. आता ते सध्या बेघर असून कुटुंबाला कुठे घेऊन जायचं हे कळत नाही. डीडीएच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, ''ज्या जमिनीवर कारवाई करण्यात आली ती नियोजित विकास जमिनीचा भाग आहे. तेथे अनेक बेकायदा बांधकामे होती. त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.''