हैदराबाद : उत्तर कोरियानं आपल्या पूर्व किनाऱ्यावरून समुद्राच्या दिशेनं आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागलं आहे. दक्षिण कोरियासोबतच्या संबंधात तणाव असताना उत्तर कोरियानं हे क्षेपणास्त्र डागलं असून त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या चाचणीनंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन म्हणाले की, अण्वस्त्रांच्या वापरामुळं देशाची स्थिती आणखीच मजबूत झालीय.
ICBM Hwasong19 क्षेपणास्त्र : उत्तर कोरियानं आपल्या नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्राची (ICBM) Hwasong-19 यशस्वी चाचणी केली आहे. दक्षिण कोरियाच्या लष्करानं उत्तर कोरियाच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. या चाचणीनंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन म्हणाले की, देशानं अण्वस्त्रांच्या वापरासाठी मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (KCNA) नुसार, उत्तर कोरियानं किम जोंग-उन यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी केली. यामुळं उत्तर कोरियाचं सशस्त्र लष्करी सामर्थ्य मजबूत झालंय. तसंच देशाच्या सशस्त्र दलांचं श्रेष्ठत्व कायम राखण्यासाठी ही मिसाईल मैलाचा दगड ठरणार आहे.
1000 किलोमीटरपर्यंत उड्डाण : दक्षिण कोरियाच्या लष्करानं सांगितलं की, सकाळी 7:10 च्या सुमारास प्योंगयांगमधून डागलेल्या क्षेपणास्त्राचा शोध लागला. क्षेपणास्त्र पूर्व समुद्रात पडण्यापूर्वी सुमारे 1000 किलोमीटर गेलं. योनहाप वृत्तसंस्थेनं सांगितलं की ते घन-इंधनयुक्त ICBM होतं. उत्तर कोरियानं गेल्या वर्षभरात केलेली ही पहिली क्षेपणास्त्र चाचणी आहे. त्याचा संबंध 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीशीही जोडला जात आहे. उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कृतीचा उद्देश कदाचित अमेरिकेच्या मुख्य भूभागावर अण्वस्त्रे पोहोचवण्याची क्षमता प्रदर्शित करणे असल्याचं बोललं जात आहे. उत्तर कोरियानं त्याचं ICBM हे अतिशय शक्तिशाली आक्षेपार्ह साधन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमध्ये सर्वोत्तम असल्याचं वर्णन केलं आहे.
KCNA नं लिहिले की, या नवीन क्षेपणास्त्राच्या नुकत्याच झालेल्या चाचणीमुळं उत्तर कोरियाची सामरिक क्षेपणास्त्र क्षमता वाढली आहे. याबाबत उत्तर कोरियाचे नेते किम यांनी समाधान व्यक्त केलंय. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनं देशानं अण्वस्त्रे तयार करण्यात आणि विकसित करण्यात ठोस यश मिळवलं आहे. उत्तर कोरियानं सांगितलं की, Hwasong-19 ने कमाल 7687.5 किलोमीटर उंचीवर 1001.2 किलोमीटरचं अंतर कापलं आणि 5156 सेकंदांपर्यंत उड्डाण केलं. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रासाठी हे सर्वात लांब उड्डाण मानलं जात होतं.