बालासोर (ओडिशा) Missile test in Odisha : बालासोर जिल्हा प्रशासनानं बुधवारी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) द्वारे नियोजित केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी चांदीपूर येथील (ITR) जवळ असलेल्या सहा गावांतील लोकांना तात्पुरतं स्थलांतरीत केलंय.
3,100 लोकांचं स्थलांतर : या संदर्भात, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, DRDO च्या सल्ल्यानुसार, बालासोर जिल्हा प्रशासनानं ITR च्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण साइटला लागून असलेल्या सहा गावांतील 3,100 लोकांना जवळच्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्याची व्यवस्था केली आहे. गावकरी उद्या सकाळी तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घेतील. त्यासाठी जिल्हा, पोलीस प्रशासनाकडून पावलं उचलण्यात आली आहेत. चांदीपुरात 'ITR' LC-III लाँच पॅडवरून प्रक्षेपण होईल.
शिबिरांमध्ये राहण्याची व्यवस्था : “जिल्हा प्रशासन आयटीआर लॉन्च साइट क्रमांक तीनच्या 2.5 किमी परिघात राहणाऱ्या सहा गावांतील 3,100 लोकांना स्थलांतरित करत आहे. तीन शिबिरांमध्ये त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, असं एका अधिकाऱयानं सांगितलं. तात्पुरतं स्थलांतरीत करण्यात आलेल्या लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी डीआरडीओ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्यात संयुक्त बैठक देखील घेण्यात आली.
शंभरहून अधिक अधिकारी तैनात : यासाठी जिल्हा प्रशासनानं शंभरहून अधिक अधिकारी तैनात केले आहेत. तसंच पोलीस दलाच्या 15 तुकड्या (एका विभागात 10 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे) स्थलांतरीतांच्या मदतीसाठी तैनात केल्या जातील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना उद्या (गुरुवारी) सकाळी ६ वाजेपर्यंत गाव खाली करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. तसंच, चाचणी पूर्ण होईपर्यंत त्यांना परत न येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या स्थलांतरीतांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असं देखील अधिकाऱ्यानं सांगितलं.
हे वाचलंत का :