मुंबई Guru Waghmare Murder : आरटीआय कार्यकर्ता आणि पोलीस माहिती देणाऱ्या गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे (वय 50) यांची 25 जुलै रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. वाघमारेची हत्या करण्यात मैत्रीण 'मेरी हलदर' आणि 'सॉफ्ट टच' स्पाचा केअरटेकर शमशद उर्फ सुरजचा हात असल्याचं चौकशीअंती उघडकीस आलं आहे. दोघांनाही आज वरळी पोलिसांनी (Worli Police) अटक करून न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने दोघांनाही 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मेरी व्हाट्सअपकॉलद्वारे होती संपर्कात : वरळीतील 'सॉफ्ट टच' स्पा हे दोन पार्टनर चालवत असून एक पार्टनर संतोष शेरेकर हा या हत्येतील आरोपी आहे. शेरेकरचे बरेच स्पा खंडणी उकळण्यासाठी वाघमारेने बंद पडले होते. त्याचा राग मनात धरून शेरेकरने त्याच्या वरळीतील स्पामध्ये काम करणाऱ्या 23 वर्षीय मुलीला हाताशी धरून हा खुनाचा डाव रचला. वाघमारेच्या खुनाबाबत मैत्रीण 'मेरी हलदर' आणि स्पाचा केअरटेकर 'शमशाद उर्फ सूरज' (वय 26) या दोघांना पूर्ण कल्पना होती. मारेकरी फिरोज अन्सारी आणि साकिब अन्सारी यांच्यासोबत मेरी व्हाट्सअपकॉलद्वारे संपर्कात होती. ती त्यांना हत्येच्या दिवशी माहिती देत असल्याचं समोर आलंय.
अशी झाली वाघमारेची हत्या : मेरी ही कुर्ल्यात वडिलांसोबत राहत असून तिची मयत आई सोलापूरची आहे. 23 जुलै रोजी सायनमधील अपर्णा बारमध्ये पार्टी करून जबरदस्तीने मेरीने वाघमारे यांना स्पावर आणलं होतं. तिथला केअरटेकर शमशाद हा त्याला सांगितल्यानुसार शटर बंद करून गेला. दरम्यान वाघमारेची हत्या झाल्यानंतर सकाळी मेरीने स्पाच्या दोन्ही पार्टनर्सना कॉल करून कळवलं होतं. मात्र, एका पार्टनरला या हत्येबाबत काहीही माहिती नव्हती. त्यामुळं त्यांनी वरळी पोलिसांना माहिती दिली.
खून करण्यासाठी वापरली कात्री : हत्येसाठी आरोपींनी कात्रीचा वापर केला. कात्रीने गळा चिरला तर तो घाव लवकर बरा होत नाही. तसेच घावाला टाके सुद्धा घालता येत नाहीत हे आरोपी साकिबला माहीत होते. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मृताची महिला मैत्रीण अद्याप संशयाच्या भोवऱ्यात आहे. फिरोज आणि साकिब यांना गुन्हे शाखेने वरळी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोघांना 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.
हत्येसाठी कात्रीचा केला वापर : वाघमारेची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक करून वरळी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. हत्येसाठी कात्री वापरण्याची कल्पना अटक आरोपी साकिब शेखला सुचली होती. आरोपींनी हत्येसाठी 7 हजार रुपयांची कात्री खरेदी केली होती. या कात्रीचे दोन भाग करण्यात आले होते. एक भाग साकिबने तर दुसरा फिरोज शेखने आपल्याकडे ठेवला होता. कात्रीच्या एका भागाने गळा चिरला आणि दुसरा पोटात भोसकून तीन ते चार वार केले. वाघमारेला मारण्यासाठी दोघांनी या कात्रीच्या दोन्ही भागांचा वापर केला. गुन्हे शाखेने ही कात्री जप्त केली आहे. तसेच साकिबने वाघमारेंच्या अंगावरील सोनसाखळी आणि अंगठी लंपास केली होती. हे दोन्ही दागिने पोलिसांनी साकिबकडून हस्तगत केले आहेत.
मारेकरी होते मागावर : पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी साकिब हा दिल्लीतून मागील 10 दिवसांपूर्वीपासून मुंबईत आला होता. तो नालासोपाऱ्यात फिरोजकडं राहत होता. साकिब आणि फिरोजने वाघमारे याच्या विलेपार्ले येथील घराबाहेर सकाळी 7.30 वाजल्यापासून हत्या करण्यासाठी थांबले होते. वाघमारे हे मंगळवारी सकाळी घरातून निघाला तेव्हा ते विलेपार्ले परिसरात फिरत होते. त्यावेळी मारेकरी त्यांच्या मागावर होते. नंतर ते घरी परतले. काही वेळाने पुन्हा ते कांदिवली परिसरात गेले आणि तेथून त्याने सायन गाठले. या काळात दोन्ही आरोपी त्याच्या घराच्या आसपास होते. वाघमारे हे विलेपार्ल्याला रवाना झाले आणि त्यावेळी मारेकरी त्याचा माग काढत कांदिवलीपर्यंत पोहचले. पण वाघमारे यांना मारण्याची संधी दोघांना मिळाली नाही.
अशी केली हत्या : आरोपींना वाघमारेला सार्वजनिक ठिकाणी मारायचं नव्हतं, म्हणून ते त्यांचा पाठलाग करत राहिले. वाघमारे कांदिवली सोडून सायन येथील अपर्णा बीअर बारमध्ये गेला असता तेथेही दोन आरोपीने त्याचा पाठलाग केला. दोघे आरोपी वाघमारेंची बिअरबारच्या बाहेर वाट पाहत होते. बाहेर येताच त्यांना ठार मारण्याचा बेत आखला होता. मात्र, वाघमारे बाहेर आले तेव्हा ते त्यांच्या महिला मैत्रिणी आणि सॉफ्ट टच स्पामधील दोन कर्मचाऱ्यांसह होते. वाघमारे हे एकटेच नसल्यानं आरोपी त्यांना मारू शकले नाही. पण ते वरळीतील सॉफ्ट टच स्पामध्ये त्याचा पाठलाग करत राहिले. दोन्ही आरोपी स्पा बाहेर वाघमारेंची वाट पाहत होते. यावेळी वाघमारे याच्यासोबत असलेले दोन स्पा कर्मचारी तेथून निघून गेले. त्यांना जाताना पाहून वाघमारे हे आत एकटेच असल्याचं आरोपींना समजलं. याच संधीचा फायदा घेत फिरोज आणि साकिब यांनी स्पामध्ये घुसून वाघमारे यांचा गळा चिरला. या प्रकरणी वरळी पोलिसांनी स्पा मालक संतोष शेरेकर, फिरोज अन्सारी आणि साकिब अन्सारी यांना अटक केली आहे.
हेही वाचा -