ठाणे : शहरातील एका खासगी शाळेतील नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षीय चिमुकल्याला महिला शिक्षिकेनं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थी जेवण करीत नसल्याचं कारण पुढे करत शिक्षिकेनं त्याला जबर मारहाण केली, असा आरोप मुलाच्या कुटुंबानं केला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाला भिंतीवर आपटले : विद्यार्थी जेवत नसल्यामुळं शिक्षिका सबिता फर्नांडिस यांनी त्याला जबरदस्तीनं पकडून त्याच्या गालावर चापट मारली आणि भिंतीवर दाबून धरले व भिंतीवर आपटले, असा आरोप कुटुंबानं केला. याबाबत मुलाच्या वडिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शिक्षिकेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल : कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिका सबिता फर्नाडीस, नर्सरीचे संस्थापक, संचालक डॅनीअज पॉल, शाळेचे हेड जयेश जाधव आणि शाळेचे ऍडमिन माधव कर्णीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती ठाणे पोलीस जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी दिली.
हेही वाचा