मुंबई : अभिनेता तथा खासदार रवी किशनची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेच्या मुलीनं मुंबई उच्च न्यायालयात रवी किशन यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. मुलीनं केलेल्या दाव्यात ती रवी किशन आणि तक्रारदार महिला यांच्या संबंधातून जन्माला आलेली मुलगी आहे. हे सिद्ध करण्यासाठी तिनं डीएनए तपासणी करण्याची न्यायालयाकडं विनंती केली आहे. त्याचप्रमाणे रवी किशन यांनी तिला मुलगी म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास नकार देऊ नये, असे आदेश देण्याची विनंतीदेखील उच्च न्यायालयाला केली आहे.
अभिनेता रवी किशन हे पिता असल्याचं नाकारत असल्यानं कायमस्वरुपी दिलासा द्यावा, असं मुलीनं याचिकेत म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात शनिवारी याचिका दाखल करत तिच्यासह आईवर उत्तर प्रदेशमध्ये दाखल झालेले गुन्हे रद्द करावे, असेही याचिकेत नमूद केलं आहे.
लखनौत काही घडलेले नसताना गुन्हे दाखल- रवी किशन यांच्या पत्नी प्रीती शुक्ला यांनी लखनौ मधील पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार महिला, तिचा पती , मुलगी , मुलगा सौनिक सोनी आणि समाजवादी पक्षाचे नेते विवेक या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीनं आईसह पत्रकार परिषद घेत अभिनेता रवी किशन विरोधात आरोप केला होता. त्यानंतर लखनौ पोलिसांनी दोघींवरही कट रचणे, जाणीवपूर्वक प्रतिमा डागाळणं आणि खंडणीसह विविध गुन्हे दाखल केले आहेत. रवी किशनची पत्नी प्रीती शुक्लाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मुलीचे वकील अशोक सरोगी आणि जय यादव म्हणाले, लखनौमध्ये काहीही घडले नसताना दोघींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याचिकाकर्ते आणि प्रीती शुक्ला हे दोन्ही मुंबईत राहतात.
दिंडोशी न्यायालयात 25 एप्रिलला सुनावणी- दिंडोशीमधील न्यायालयातही महिलेनं दिवाणी दावा केला आहे. या दाव्यानुसार तिचे रवीकिशन सोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे 1991 मध्ये लग्न झाले. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे दोघे एकत्रित राहू शकले नाहीत. मुलीचा १९९८ मध्ये जन्म झाला. मात्र, किशनचा आधीच विवाह झाल्याची माहिती उघड झाली. काहीकाळ दोघांनीही मुलीची काळजी घेतली. नुकतेच मुलीनं अभिनेता रवी किशनची भाजपा कार्यालयात भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यानं मुल भेटण्यास नकार दिला. त्यामुळे पत्रकार परिषद घेतल्याचं महिलेनं दाव्यात म्हटलं आहे. रवी किशनच्या पत्नीनं गुन्हा दाखल करूनही पत्रकार परिषदेत काहीही बदनामीकारक वक्तव्य केलं नव्हतं, असेही या महिलेनं म्हटलं आहे. या प्रकरणात दिंडोशी न्यायालयात 25 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तर मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण पुढील आठवड्यात सुनावणीला येण्याची शक्यता आहे.
रवी किशन अडचणीत- लोकसभा निवडणुकीत रवी किशन हे भाजपाचे गोरखपूर मतदार संघातील उमेदवार आहेत. त्यांच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सभादेखील सुरू झाल्या आहेत. अशातच त्यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल झाल्यानं त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवडणुकीच्या धामधूमीत रवी किशन यांच्यावर महिला आणि तिच्या मुलीनं पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-