मुंबई Morris Narona : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री फेसबुक लाइव्ह दरम्यान गोळीबार झाला. मॉरिस नरोना यानं त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या, ज्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. अभिषेक घोसाळकर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, गोळीबारानंतर मॉरिसनं स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकारानं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळं मॉरिस नरोना कोण होता, याबाबतची माहिती जाणून घेऊया.
दोघांमध्ये होती राजकीय कटूता : अभिषेक घोसाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून प्रभाग क्रमांक सात मधून महापालिकेवर निवडून गेले होते. याच प्रभागातून मॉरिस नरोना महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक होता. त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय कटूता होती. मात्र एका महिन्यापूर्वी त्यांनी आपसातील मतभेद दूर केले होते. मॉरिस नरोना आणि अभिषेक घोसाळकर यांनी एकत्र येत आयसी कॉलनीच्या विकासासाठी काम करण्याची घोषणा केली होती.
कोण होता मॉरिस नरोना? : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असली, तरी मॉरिस नरोना याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. मॉरिस नरोना हा अनेक वर्ष परदेशात होता. कोरोना महामारी पूर्वी तो आयसी कॉलनीमध्ये परतला. कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला. यानंतर मॉरिसनं महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानं जोमात तयारी सुरू केली. मात्र या परिसरात अभिषेक घोसाळकर यांचा पूर्वीपासून प्रभाव होता. त्यामुळे दोघांमध्ये चढाओढ सुरू झाली.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती : मॉरिस नरोनावर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. एका वर्षापूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्या सांगण्यावरुन एका प्रकरणात मॉरिसवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर या दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झालं. मॉरिस नरोना यानं अभिषेक घोसाळकर यांच्यावर ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, ते पिस्तूल विनापरवाना असल्याचं उघड झालं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील राणे यांनी ही माहिती दिली. कोरोनात केलेल्या कामांमुळे मॉरिस याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते राजभवनात गौरव झाला होता. तसेच त्यानं नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे आता ही घटना एका मोठ्या राजकीय कटाचा भाग आहे का? अशा चर्चा देखील होऊ लागल्या आहेत.
दुपारी होणार अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार : अभिषेक घोसाळकर यांचा मॉरिस भाईनं खून केल्यानंतर त्यानं आत्महत्या केली. त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेह जे जे रुग्णालयात नेण्यात आला. आज सकाळी जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्या मृतदेहावर दुपारी 3 वाजता दौलतनगर स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचे सगळे कार्यक्रम रद्द : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा मॉरिसभाईनं खून केल्यानं उबाठा नेत्यांना चांगलाच हादरा बसला. उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आजचे आपले सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यसंस्काराला बोरिवलीत जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उबाठा गटाचे आमदार आणि खासदारांसह नेत्यांचा सहभाग राहणार आहे.
हे वाचलंत का :