सोलापूर- अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केल्याने आंबेडकरी प्रेमी जनता संताप व्यक्त करीत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी सोलापूर शहरातील आंबेडकर चौकात राहुल सोलापूरकरांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलंय. सोलापूरकर याच्या बॅनरला जोडे मारून निषेध करण्यात आलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केलाय.
1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस : राहुल सोलापूरकर यांनी स्वतःचे आडनाव बदलून घ्यावे, त्यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या नावाचा अपमान होतोय. राज्य उपनेते शरद कोळी यांनी राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिलीय. अभिनेते राहुल सोलापूरकर नेहमीच वादग्रस्त विधान करीत असतात. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने एक लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलंय. राहुल सोलापूरकर याला जो कुणी मारेल, त्याला आम्ही 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ, असे जाहीरपणे शिवसेनेचे वतीने घोषणा केलीय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलंय.
सोलापूरकरला फोडून काढा : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राज्य उपनेते शरद कोळी म्हणाले की, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरला फोडून काढा. राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे त्याचे तोंड चपलीने रंगवणाऱ्या व्यक्तीला 1 लाखांचे बक्षीस मी जाहीर करीत आहे, अशी घोषणाच त्यांनी केलीय. शिवसेनेचे पदाधिकारी सत्तार सय्यद यांनी राहुल सोलापूरकरवर जबरदस्त टीका करत 51 हजार रुपये वाढवून 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देणार, असे जाहीरपणे सांगितलंय.
औरंगजेबाच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिली : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचे, त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण आहे. लोकांना गोष्टी स्वरूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावे लागते. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो, असे ते एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले होते. त्यावरूनही मोठा वाद झाला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान : राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय. एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेण्यात आल्याचं वक्तव्य केलंय. वेदानुसार ते ब्राह्मणच आहेत, असे राहुल सोलापूरकर म्हणताना दिसत आहेत. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत सोलापूरकरांना झोडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य उपनेते शरद कोळी यांनी तोंड फोडा आणि एक लाख रुपये मिळवा, असे बक्षीस जाहीर केलंय.
सोलापूर जिल्ह्याचे नाव खराब होतेय : राहुल सोलापूरकर हे नेहमी वादग्रस्त विधान करीत आहेत. भारतातील आणि महाराष्ट्रातील महान आणि थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राहुल सोलापूरकर हे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांनी राहूल सोलापूरकर यांनी स्वतःचे आडनाव बदलून घ्यावे,त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे नाव खराब होत आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा -