मुंबई- राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे गेल्या काही दिवसांपासून उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या कार्य प्रणालीवर नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. यानंतर मंत्री उदय सामंत हे उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र मी कुठेही उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज नाही. नाराज असण्याचे कारण नाही, असा खुलासा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज केलाय. सोमवारी बाळासाहेब भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
निर्णयाची माहिती हवी : “मी उद्योगमंत्री या नात्याने 4 फेब्रुवारी रोजी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले. पण हे पत्र तुमच्या हाती उशिरा मिळाले. मंत्री म्हणून प्रशासनाचे जे धोरणात्मक निर्णय होतात, त्याची कल्पना मला असावी, अशी पत्रातून अपेक्षा व्यक्त केली. कारण निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती मला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठल्याही निर्णयांची माहिती असणं आवश्यक आहे. एवढेच मी पत्रातून म्हटलं आहे. याचा अर्थ मी नाराज आहे असा होत नाही, असा खुलासा आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय.
नाराज असण्याचे कारण नाही : पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, सत्तेचं विकेंद्रीकरण जसं राजकारणात महत्त्वाचं असतं. तसे अधिकाऱ्यांच्या बाबतीतही महत्त्वाचं असतं. मी यापूर्वीही अनेक खात्यांची जबाबदारी पार पाडली आहे. सगळ्याच कामांसाठी सहीसाठी मंत्र्याकडे येण्याची गरज नाही. काही गोष्टी ह्या सचिवांच्या पातळीवर सोडविण्याची गरज आहे, अशी भूमिका मी पत्रातून मांडली. याचा अर्थ मी नाराज नाही. किंवा नाराज असण्याच काहीच कारण नाही, असंही मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय.
हेही वाचा -