पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली आणि ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये : फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १२ वीच्या परीक्षेचं आवेदनपत्र ऑनलाईन स्वीकारण्यात आली असून सरल डेटावरून कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्यात आलेली आहेत.
हे वेळापत्रक ग्राह्य धरावे : विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीनं इ. १२ वी परीक्षेचं वेळापत्रक तयार करण्यात आलं. परीक्षेदरम्यान बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द आणि छपाई केलेलं वेळापत्रकच ग्राह्य धरावं. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असं सांगण्यात आलय.
समुपदेशकांची केली नियुक्ती : परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीनं मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलीय. तसंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलीय. तसंच राज्य मंडळ आणि ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली.
परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहणं आवश्यक : सर्व परीक्षार्थीनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. सकाळ सत्रात स. १०:३० आणि दुपार सत्रात दु. २:३० वाजता परीक्षार्थीनी परीक्षा दालनात उपस्थित राहणं आवश्यक आहे.
परीक्षा केंद्राच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण : राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कैमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. तसंच परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. तसंच परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल.
हेही वाचा -
- दहावी, बारावीची परीक्षा यंदा लवकर; वाचा, परीक्षेचे वेळापत्रक - SSC HSC Exam Time Table 2025
- जन्मतःच दोन्ही हात नसलेल्या गौसनं चक्क पायानं पेपर लिहून बारावीत मिळवले 78 टक्के मार्क... - Gous Shaikh Motivatinal Story
- कुर्ल्यातील आईनं लेकासह दिली 12वीची परीक्षा, दोघांनी मारली बाजी...सर्वत्र होतंय कौतुक - Son Mother HSC Result