अमरावती : संपूर्ण विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे चक्क भर दुपारी विविध चौकांमध्ये शेकोटी पेटलेली पाहायला मिळतेय. ही थंडी आंब्याच्या मोहरासाठी फायदेशीर आहे, मात्र काळजी न घेतल्यास संत्रा उत्पादकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
मेळघाट गारठला : सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेल्या मेळघाटात गेल्या पंधरा दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. गेल्या शुक्रवारी चिखलदरा येथील पारा पाच अशापर्यंत घसरला होता. सोमवारी आणि आज मंगळवारी चिखलदरा येथील पारा सात अंश इतका नोंदवला गेला. दुपारी बारा वाजता देखील अंगात उबदार कपडे आणि थंडीपासून बचावासाठी डोक्यात टोपी घालूनच स्थानिक रहिवासी आणि पर्यटक पाहायला मिळत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळं चिखलदऱ्यासह मेळघाटातील अनेक गावात दिवसाची सुरुवात ही सकाळी नऊ ते दहा वाजल्यापासून होत आहे. सायंकाळी सहा ते सात वाजल्यापासूनच रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत असून पर्यटक हॉटेलमध्ये किंवा स्टे होममध्ये दारं खिडक्या बंद करून राहात आहेत. स्थानिक रहिवासी घराबाहेर पडणं टाळत आहेत.
पर्यटक घेत आहेत थंडीची मजा : कडाक्याच्या थंडीत पहिल्यांदाच चिखलदऱ्यात येणारे काही पर्यटक मात्र कडाक्याच्या थंडीची मजा घेत आहेत. "चिखलदरा येथील थंडी शरीरासाठी उपयुक्त असल्यामुळं आम्ही या ठिकाणी विविध पॉईंटवर थंडी अनुभवण्यासह पर्यटनाचा आनंद घेत आहोत," अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर येथून आलेले पर्यटक अशोक चिनागी यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली. "कुटुंबासह चिखलदरा येथे फिरायला आलो असताना सायंकाळी साडेसात नंतर आम्ही खोली बाहेर पडलो नाही. आज सकाळी साडेदहा वाजता घराबाहेर निघालो, इथं फारच थंडी आहे," अशी प्रतिक्रिया रुद्र मामर्डे या चिमुकल्यानं दिली.
20 डिसेंबर पर्यंत कडाक्याची थंडी : "विदर्भात सर्वत्र तापमान घसरलं असून आणखी तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत विदर्भात कडाक्याची थंडी असेल. चिखलदऱ्यासह मेळघाटातील अनेक भागात पारा हा येत्या तीन दिवसात चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे," असं श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितलं.
आंब्याला अनुकूल वातावरण : "कडाक्याच्या थंडीचं वातावरण हे आंब्याला मोहर येण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. काही ठिकाणी आंब्याच्या मोहरला फूट सुरू झालेली आहे. पुढील आठ दिवसात 50 टक्क्यांपेक्षा जास्त आंबा मोहरण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याच्या बागेत कोणत्याही परिस्थितीत पाणी देऊ नये, तसंच मोहर येण्यापूर्वी कीटकनाशक बुरशीनाशक तसंच अन्नद्रव्याची फवारणी केल्यास फायदा होईल," असं देखील प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितलं. "थंडीपासून संत्रा बागेचा बचाव करणं आवश्यक आहे, यासाठी संत्रा बागेत हलकं पाणी देणं गरजेचं आहे. संत्रा बागेला अति पाणी दिल्यास झाडांचं आरोग्य बिघडेल," असा इशारा प्राध्यापक अनिल बंड यांनी दिला.
हेही वाचा