नागपूर- नागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काही महिन्यांत नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबईदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एक प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती नागपूरचे नवनियुक्त डीआरएम विनायक गर्ग यांनी दिलीय. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय. सध्या नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-इंदोर आणि नागपूर भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. त्यात नव्या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे.
तीन महिन्यांपूर्वीच भली मोठी वेटिंग लिस्ट : नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर प्रवास करणऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. मात्र, गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने तीन महिन्यांपूर्वीच भली मोठी वेटिंग लिस्टसुद्धा तयार झालेली असल्यानं गरजू प्रवाशांना आगाऊ पैसे खर्च करून खासगी बसचा पर्याय निवडावा लागतोय. त्यामुळे यासंदर्भात गेल्या वर्षांपासून नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाच्या या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केलाय.
स्लीपर वंदे भारतची केली मागणी : नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर प्रवास करण्यासाठी किमान 10 ते 15 तासांचा कालावधी लागतो, त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करताना ती स्लीपर क्लासची असावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.
प्रवासाचा वेळ कमी होणार : नागपूर ते मुंबईदरम्यान मेल एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी 16 तास लागतात, तर सुपरफास्ट एक्सप्रेसने 12 ते 13 तासांचा वेळ लागतो. तर दुरांतो एक्सप्रेस 11 ते 12 तासांत प्रवाशांना मुंबईला पोहोचवते. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतरही प्रवास केवळ 10 तासांत पूर्ण होणार आहे. त्याप्रमाणे नागपूर ते पुणेदरम्यान प्रवासाला 15 ते 16 तास लागतात. वंदे भारतने या प्रवासाचे दोन ते तीन तास कमी होणार आहेत.
वेटिंग लिस्ट संपणार : नागपूर ते पुणे या मार्गावर रोज साधारणपणे 5 ते 6 हजार प्रवासी प्रवास करतात. नागपूरवरून सध्या नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी आठवड्यातून तीनदा तर गरीबरथ एक्सप्रेस तीन वेळा धावते. याशिवाय आठवड्यातून एकदा हमसफर एक्सप्रेसदेखील आहे. मात्र, या सर्व गाड्यांमध्ये प्रवासासाठीची वेटिंग लिस्ट फार मोठी असते. याशिवाय आझाद हिंद एक्सप्रेस, हटिया पुणेदेखील आहे. मात्र, त्याचे तिकीटदेखील मिळत नाही. सण-उत्सवाच्या काळात तर परिस्थितीचे वर्णनदेखील केले जाऊ शकत नाही. हीच परिस्थिती नागपूर ते मुंबईदरम्यानदेखील आहे. गोंदिया ते मुंबईला जाणारी विदर्भ एक्सप्रेस, नागपूर ते मुंबईला जाणारी सेवाग्राम एक्सप्रेस या दोन हक्काच्या गाड्या आहेत, पण त्यामध्ये असलेली वेटिंग कधीही संपत नाही, असा प्रवाशांचा अनुभव आहे. आता वंदे भारत एक्सप्रेसच्या निमित्ताने दोन्ही मार्गावर प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा -