मुंबई Under Ground Hawker Market : मुंबईत 10 वर्षांनंतरही महापालिकेला फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करता आलेली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे जागेची कमतरता. फेरीवाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने दिल्लीप्रमाणे मुंबईतही भूमिगत मार्केट बांधण्याचा निर्णय घेतलाय. या विशेष प्रकल्पांतर्गत महापालिका फेरीवाल्यांसाठी हक्काची जागा उपलब्ध करुन देणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेनं अंधेरी पश्चिम इथं असलेल्या आंब्रे उद्यानाची जागा पाहिली असून या उद्यानाखाली भूमिगत दोन मजली मार्केट उभारण्यात येणार आहे. अंधेरी पश्चिमेकडील फेरीवाल्यांना इथं जागा दिली जाणार आहे. सुमारे 500 फेरीवाल्यांना याचा फायदा होणार असल्याचा अंदाज महापालिकेनं व्यक्त केलाय.
सर्व 24 प्रभागांमध्ये राबविणार प्रकल्प : महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी इथं उभारण्यात येणारा शॉपिंग प्लाझा हा प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार असून, ही अंडरग्राउंड इमारत दुमजली असेल. यातील एका मजल्यावर दुकानं तर दुसऱ्या मजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. अंधेरी येथील प्रकल्पाला यश आल्यास दादर आणि सायन इथंही अशाच पद्धतीचा अंडरग्राउंड शॉपिंग प्लाझा बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे. फेरीवाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महापालिकेला भूमिगत मार्केट तयार करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. मुंबईतील फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळावी आणि त्यातून त्यांना रोजगार मिळावा यासाठी हाच प्रकल्प आगामी काळात सर्व 24 प्रभागांमध्ये राबवण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट अंधेरी इथं राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेनं दिलीय.
फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करुन देणं आव्हान : महापालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, या अंडरग्राउंड प्लाझासाठी ज्या बागेची निवड करण्यात आलीय, त्याच्या कामासाठी मोठी जागा लागेल. याबाबत लवकरच उद्यान विभागाशी चर्चा करण्यात येणार आहे. खरं तर फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देणे हे महापालिकेसाठी मोठं आव्हान बनलंय. त्यामुळं मुंबईतील मैदानांखाली भूमिगत फेरीवाला क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. मात्र, मुंबईत फेरीवाला धोरण कधी लागू करणार याची महापालिकेकडं निश्चित कालमर्यादा नाही. अलीकडेच राज्य सरकारला केंद्र सरकारच्या स्ट्रीट व्हेंडर्स ॲक्ट 2014 मधील तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत शहरातील एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोकांना परवाने देऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावा असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत.
हेही वाचा :