सातारा : उपचार करुन नैसर्गिक अधिवासात सोडलेल्या जखमी बिबट्यानं वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले. निवृत्ती चव्हाण असं बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा बिबट्या सोमवारी वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता. त्याला रेस्क्यू करण्यासाठी वन बिभागाचं पथक गेलं होतं. दरम्यान जखमी बिबट्यानं साताऱ्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानं मोठी खळबळ उडाली असून नागरिक हादरले आहेत.
जखमी बिबट्याचा पथकावर हल्ला : वन विभागाला सोमवारी बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्यावर उपचार करुन त्याला उंटाचा डोंगर परिसरात सोडण्यात आलं. मात्र, बिबट्या त्याच परिसरात दिसून आला. नेमकं काय झालंय, हे पाहण्यासाठी गेलेल्या वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्या पथकावर बिबट्यानं हल्ला चढवला.
बिबट्याबरोबरच्या थरारात कर्मचारीही जखमी : नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्यानंतरही बिबट्या जखमी होता. सातारा वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांचं पथक बिबट्याच्या दिशेनं जात असताना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला चढवला. या थरारात वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्यासोबतचे कर्मचारीही जखमी झाले.
जाळी टाकल्यानं बिबट्या चवताळला : वन विभागाच्या पथकानं जखमी बिबट्याला पकडण्यासाठी जाळी टाकली. मात्र, बिबट्या जाळीत सापडला नाही. उलट चवताळलेल्या बिबट्यानं वनक्षेत्रपाल आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर झेप घेऊन हल्ला केला. या झटापटीत वनक्षेत्रपालासह वनरक्षक सुहास काकडे, भूषण गावंडे, महेश अडागळे, सचिन कांबळे, मयूर अडागळे हे जखमी झाले. सातारा रेस्क्यू टीमच्या ओमकार ढाले, मयूर तिखे, ओंकार अडागळे, हर्षल मदने, अनिकेत जंगम, शुभम औंधकर यांनी बिबट्याला जेरबंद करून उपचारासाठी पुणे इथं पाठवून दिलं.
हेही वाचा :