मुंबई- बांगलादेशी घुसखोरानं घरात घुसून हल्ला ( Saif ali attack case) केल्यानंतर अभिनेता सैफ अली खाननं सुरक्षेबाबात अधिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता रोनित रॉयच्या कंपनीकडून सेलिब्रिटींना खासगी सुरक्षा पुरविण्यात येते. याच कंपनीकडून सैफ अली खाननं सुरक्षा घेतली आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटींनी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जाहीरपणं चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशी आरोपी अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरल्यानंतर अभिनेता राहत असलेल्या इमारतीच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता सैफ अली खाननं अभिनेता रोनित रॉयच्या एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन या सुरक्षा एजन्सीची सेवा घेतली आहे. सैफ अली खानच्या घराला सुरक्षा पुरविण्याबाबत अभिनेता रोनित रॉयनं थेटपणं उत्तर दिलं नाही. "आम्ही आधीही अभिनेता सैफसोबत आहोत. तो आता बरा असून परतला आहे," असं अभिनेता रोनितनं म्हटलं आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Police along with Mohammad Shariful Islam Shehzad, the accused in the Saif Ali Khan attack case, leave from the building near Saif Ali Khan's residence after recreating the crime scene. pic.twitter.com/TQS8RepFjB
— ANI (@ANI) January 21, 2025
बनावट आधारकार्ड तयार करून मिळवलं सीमकार्ड- मुंबई पोलिसांनी ठाणे येथून झुडपात लपलेल्या मोहम्मद शहजादला अटक केली. या अटकेनंतर आरोपी हा बांगलादेशमधील राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती चॅम्पियन असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आरोपीनं सात महिन्यांपूर्वी बेकायदेशीरपणं भारतात घुसखोरी केली होती. मोबाईल सीम कार्ड मिळविण्यासाठी आरोपीनं पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचं बनावट आधारकार्ड तयार केलं होतं. मुंबईत आल्यानंत विजय दास या नावानं त्यानं वेटर आणि हाऊस किपींगमध्ये काम केलं होतं.
थेट इमारतीत घुसखोरी- मुंबई पोलिसांनी मंगळवारी सतगुरु शरण इमारतीत आरोपी घेऊन गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं. यावेळी इमारतीत असलेल्या सुरक्षेतील त्रुटी ठळकपणानं समोर आल्या आहेत. आरोपी इमारतीच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरला होता. तेव्हा सुरक्षा रक्षक गाढ झोपेत आढळल्यानंतर त्यानं थेट इमारतीत घुसखोरी केली होती.
इमारतीच्या सुरक्षेत कोणत्या आढळल्या त्रुटी
- इमारतीबाहेर सुरक्षारक्षक झोपलेले असल्यानं सुरक्षेबाबत हलगर्जीपणा दिसून आला.
- इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही नव्हते.
- इमारतीत प्रवेश करतानाही कोणताही सुरक्षा रक्षक नव्हता.
- एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, "इमारतीमधील सुरक्षा रक्षक गाढ झोपेत असल्याचं पाहून आरोपी मुख्य प्रवेशद्वारातून इमारतीत शिरला. तिथे कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला नव्हता. चालताना कोणताही आवाज येऊ नये म्हणून आरोपीनं त्याचे बूट काढून बॅगेत ठेवले. त्याचा फोनदेखील बंद करून ठेवला".
पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर करणार तपास- सध्या आरोपीला पोलिस लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही आरोपीला भेटण्याची परवानगी नाही. इतर आरोपींना दिलं जाणारं जेवण मोहम्मद शहजादला दिलं जात आहे. अभिनेता सैफ अली खान मारहाण प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या जागी पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अजय लिंगनूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे ते सैफवरील हल्ल्याचा तपास करणार आहेत.
हेही वाचा-